मुलगा करोडपती असूनही या अभिनेत्याचे वडील आजही चालवतात बस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 02:14 PM2019-01-09T14:14:51+5:302019-01-09T14:20:43+5:30
या प्रसिद्ध अभिनेत्याकडे प्रचंड पैसा असला तरी आजही त्याचे वडील बस ड्रायव्हर म्हणून काम करतात. त्यांनी हे काम करण्यामागे एक खास कारण आहे.
कन्नड फिल्म केजीएफची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने केवळ काहीच आठवड्यात २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. केजीएफ हा दाक्षिणात्य सिनेमा असला तरी या चित्रपटाने हिंदीत देखील ४० कोटीहून अधिक गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या झिरो तर रणवीर सिंगच्या सिम्बा या चित्रपटाला टक्कर दिली आहे. या चित्रपटाचा नायक यश असून त्याने आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
यशचा कालच म्हणजेच ८ जानेवारीला वाढदिवस होता. यशचे खरे नाव कुमार गौडा असे असून त्याने छोट्या पडद्याहून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने नंदा गोकुळ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या त्याच्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर जम्बाडा हुडुगी या चित्रपटाl त्याने काम केले. या चित्रपटात त्याला साहाय्यक भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. पण त्याची ही भूमिका प्रेक्षकांना आवडली. आज दक्षिणेतील सुपरस्टारमध्ये त्याची गणना केली जाते. यशने त्याच्या १२ वर्षांच्या करियरमध्ये १८ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यशने आज पैसा, प्रसिद्धी सगळे काही मिळवले आहे. त्याच्याकडे ४० कोटीहून अधिक प्रापर्टी असून त्याचा बंगलुरूमधील बंगला हा तीन कोटींचा आहे. यश एका चित्रपटासाठी चार ते पाच कोटी रुपये घेतो.
यशकडे इतका पैसा असला तरी आजही त्याचे वडील बस ड्रायव्हर म्हणून काम करतात. त्यांनी हे काम करण्यामागे एक खास कारण आहे. बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते की, यशचे वडील बस ड्रायव्हर आहेत हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले होते. पण त्यांनी आपल्या मुलांसाठी जे काही केले, ते ऐकून ते खरे हिरो असल्याची मला जाणीव झाली.
बस ड्रायव्हर म्हणून काम करत असल्यानेच यशच्या वडिलांना त्यांचे स्वप्न पूर्ण करता आले. त्यांच्या या प्रोफेशनमुळेच त्यांच्या मुलाला इतके यश मिळाले त्यामुळेच त्यांनी हे प्रोफेशन आजही न सोडण्याचा निर्णय घेतला आहे.