KGF Star Yash : बॉलिवुड दाक्षिणात्य सोडा, 'भारत म्हणा'; केजीएफ स्टार 'यश'च्या उत्तराने जिंकले चाहत्यांचे मन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 04:56 PM2022-12-23T16:56:03+5:302022-12-23T16:57:27+5:30
'केजीएफ'ला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर अभिनेता यशने जगभरात प्रसिद्धी मिळवली. हे वर्ष दाक्षिणात्य सिनेमांसाठी नक्कीच चांगलं ठरलं.
KGF Star Yash : 'केजीएफ'ला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर अभिनेता यशने जगभरात प्रसिद्धी मिळवली. हे वर्ष दाक्षिणात्य सिनेमांसाठी नक्कीच चांगलं ठरलं. यंदा दाक्षिणात्य सिनेमांनी बॉलिवुडलाही मागे टाकले. केजीएफ, कांतारा (Kantara) या कन्नड सिनेमांनी बक्कळ कमाई केली. एका मुलाखतीत अभिनेता यशने सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.
दाक्षिणात्य सिनेमा विरुद्ध बॉलिवुड हा वाद काही नवीन नाही. याआधी देखील या गोष्टींवर चर्चा झाली आहे. या सगळ्या वादात केजीएफ स्टार यशने बॉलिवुडला पाठिंबा दिला आहे. फिल्म कम्पॅनियनसोबतच्या मुलाखतीत यशने सांगितले, ' कर्नाटकच्या जनतेने इतर इ्ंडस्ट्रीचा अनादर करणं मला आवडणार नाही. आम्ही देखील अशा संकटाचा सामना केला आहे. सध्या जो सन्मान मिळतोय तो मिळवण्यासाठी सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. यानंतर इतरांसोबत गैरव्यवहार करणं चुकीचं ठरेल. सर्वांचा सन्मान केला पाहिजे. हे उत्तर दक्षिण भेदभाव विसरा आणि बॉलिवुडचाही आदर करा.'
यश पुढे म्हणाला, कोणालाही घेरणे चांगली गोष्ट नाही.सध्या बॉलिवुडचा एक काळ सुरु आहे ते एका फेज मधून जात आहेत. त्यांनी आम्हाला खूप काही शिकवले आहे. एक देश म्हणून आपण चांगले सिनेमे बनवले पाहिजेत. सोयीसुविधा वाढवल्या पाहिजे आणि थिएटर बनवले पाहिजेत. करायला बरंच काही आहे सध्याच्या पिढीने एकमेकांसोबतचे मतभेद दूर केले पाहिजेत. बाहेर पडून बाकी जगाचा सामना केला पाहिजे आणि म्हणले पाहिजे ,' भारत देश आला आहे.'
एकीकडे यशने बॉलिवुडची बाजू घेतली असताना दुसरीकडे इतर दाक्षिणात्य कलाकारांचे विधान बॉलिवुडच्या विरोधात होते. काही दिवसांपूर्वी सुपरस्टार महेशबाबूने विधान केले, 'बॉलिवुडला माझी फी परवडणार नाही.' या विधानामुळे बॉलिवुडमध्ये खळबळ माजली होती. तसंच ्अभिनेता किच्छा सुदीपने 'hindi is no more a national language' असे ट्विट केले होते. यानंतर बॉलिवुड कलाकार आणि किच्छा सुदीप यांच्यात ट्विटरवर खडाजंगी झाली होती.