कियारा अडवाणी म्हणते, 'गुड न्यूज'नं दिलं खूप काही..., वाचा सविस्तर
By तेजल गावडे | Published: December 25, 2019 06:00 AM2019-12-25T06:00:00+5:302019-12-25T06:00:00+5:30
'गुड न्यूज' चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
करण जोहर, शशांक खेतान निर्मित आणि राज मेहता दिग्दर्शित 'गुड न्यूज' चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यानिमित्ताने तिच्याशी केलेली ही बातचीत...
'गुड न्यूज' चित्रपटाबद्दल थोडक्यात सांग?
'गुड न्यूज' चित्रपटातून लोकांना आयव्हीएफबद्दल माहिती मिळणार आहे. या चित्रपटात बत्रा आडनाव असलेल्या दोन यंग कपलची कथा रेखाटण्यात आली आहे. जे आयव्हीएफ ट्रीटमेंट एकाच हॉस्पिटलमध्ये घेत असतात. आडनाव सारखे असल्यानं स्पर्म एक्सजेंच होतात आणि मग उडणारा गोंधळ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. आयव्हीएफचा मुद्दा चित्रपटात विनोदी ढंगात सादर करण्यात आला आहे. या चित्रपटात खूप इमोशन्सदेखील आहेत. एकंदरीत हा फॅमिली एण्टरटेनिंग चित्रपट आहे.
पंजाबी तरूणीची भूमिका साकारताना तुला काय तयारी करावी लागली?
'गुड न्यूज' चित्रपटातून मी पहिल्यांदाच पंजाबी गर्लची भूमिका साकारताना दिसणार आहे. पंजाबी भाषेचा उच्चार नीट करता यावेत म्हणून दिग्दर्शक राज मेहता यांनी पंजाबी भाषेच्या प्रशिक्षकाला बोलवले होते. त्यांनी मला महिन्याभरात पंजाबी भाषेचे उच्चार शिकवले. चित्रपटात हिंदीमध्ये डायलॉग्स असले तरी त्याला पंजाबी टच देण्यात आला आहे. मी व राज मेहताने बरेच वर्कशॉप केले होते. दिलजीत दोसांझ आल्यानंतर त्याच्यासोबत थोडे वर्कशॉप केले. त्यानंतर आम्ही शूटिंगला सुरूवात केली. दिलजीत पंजाबी असल्यामुळे मला शूटच्या वेळी डायलॉग्स बोलताना काही अडचणी आल्या तर मी त्याला विचारायचे. त्याने मला खूप मदत केली.
प्रेग्नेंट महिलेची भूमिका साकारण्यासाठी तुला काही विशेष मेहनत घ्यावी लागली का?
अजिबात नाही. प्रत्येक स्त्रीमध्ये एक आई दडलेली असते. माझ्या आईची नर्सरी स्कूल आहे. ग्रॅज्युएशन झाल्यावर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी काही काळ मी आईच्या नर्सरीत मुलांना शिकवण्यासाठी जायचे. ८ महिन्यांच्या मुलांपासून ४ ते ५ वर्षांची मुलं तिथे यायची. त्यामुळे त्यांचे डायपर बदलण्यापासून एबीसीडी शिकवण्यापर्यंतची कामं मी करत होते. तेव्हापासून माझे लहान मुलांसोबत चांगले ट्युनिंग जमले होते.
तुझ्या सहकलाकारांबद्दल काय सांगशील?
अक्षय सरांनी मला बॉलिवूडमध्ये लाँच केलं आहे. आता त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटानंतर आम्ही दोघे लक्ष्मी बॉम्ब चित्रपटात एकत्र काम करत आहोत. यात त्यांच्यासोबत मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ज्यांच्यासोबत मी माझ्या करियरची सुरूवात केली आणि आता त्यांच्यासोबत काम करायला मला मिळत आहे. करीनाची मी बालपणापासून चाहती आहे आणि नेहमीच राहीन. त्यांच्या चित्रपटातील त्यांचे डायलॉग्स मी बालपणी आरश्यासमोर उभी राहून बोलायचे. आता त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळाली. त्यामुळे मी खूप खूश आहे. त्या खूप शांत व मजेशीर आहे. त्या उत्स्फूर्त अभिनेत्री आहेत आणि त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं. गुड न्यूजच्या सेटवर मी खूप ज्युनिअर होते. त्यामुळे अक्षय सर, करीना मॅम व दिलजीत यांच्यासोबत काम करताना त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.
तू पहिल्यांदाच कॉमेडी चित्रपटात काम करत आहेस, तुला कॉमेडी भूमिका करणं चॅलेंजिंग वाटलं का?
'गुड न्यूज' हा पहिला चित्रपट आहे. ज्यात मी कॉमेडी करताना दिसणार आहे. त्यामुळे माझ्यासाठी कॉमेडी रोल करणं चॅलेंजिंग होतं. या चित्रपटानंतर माझे आगामी चित्रपट 'इंदु की जवानी' व 'भुल भुलैया २'चा जॉनरदेखील कॉमेडी आहे. त्यामुळे 'गुड न्यूज' माझ्यासाठी कॉमेडीचा पाया आहे. या चित्रपटातून मी अक्षय सर व दिलजीतकडून जे शिकले आहे त्याचा मला माझ्या पुढच्या चित्रपटांसाठी उपयोग होणार आहे. 'इंदु की जवानी' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी मी खूप कम्फर्टेबल झाले होते. कारण मला 'गुड न्यूज' चित्रपटातून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. 'भुलभुलैया २' चित्रपटाच्या शूटिंगला पुढील महिन्यात सुरूवात होणार आहे.
- तेजल गावडे