"मला जुळी मुलंं हवी!"; गरोदर असलेल्या कियारा अडवाणीने केलेलं वक्तव्य चर्चेत; म्हणाली- "देवाने मला..."
By देवेंद्र जाधव | Updated: March 3, 2025 13:23 IST2025-03-03T13:22:52+5:302025-03-03T13:23:27+5:30
कियारने काही वर्षांपूर्वी केलेलं वक्तव्य आता गाजतंय. कियारा गरोदर असल्याने तिने केलेलं हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे (kiara advani)

"मला जुळी मुलंं हवी!"; गरोदर असलेल्या कियारा अडवाणीने केलेलं वक्तव्य चर्चेत; म्हणाली- "देवाने मला..."
काहीच दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने (kiara advani) सर्वांना गुड न्यूज दिली. कियाराने एक खास फोटो पोस्ट करत ती आणि तिचा पती अन् अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (siddharth malhotra) आई-बाबा होणार असल्याचा खुलासा केला. कियाराने ही गुड न्यूज देताच सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय. अशातच कियाराचं एक जुनं वक्तव्य चर्चेत आहे. यात ती एका मुलाखतीत तिला जुळी मुलं हवी, अशी इच्छा प्रकट करताना दिसते. काय म्हणाली कियारा?
कियाराला हवी आहेत जुळी मुलं
ही गोष्ट २०१९ ची. जेव्हा कियाराचा 'गुड न्यूज' सिनेमा रिलीजच्या उंबरठ्यावर होता. या सिनेमात कियारासोबत अक्षय कुमार, दिलजीत दोसांझ आणि करीना कपूर यांनी अभिनय केला होता. यावेळी एका मुलाखतीत कियारा म्हणाली होती की, "मला जुळी मुलं व्हावीत अशी इच्छा आहे. दोन मुली किंवा दोन मुलं किंवा एक मुलगी-एक मुलगा अशी मुलं व्हावीत अशी मला इच्छा आहे. देवाने मला दोन सुदृढ मुलं द्यावीत असं मला वाटतं." अशाप्रकारे कियाराने खुलासा केला होता. कियाराने दिलेलं उत्तर ऐकून 'मिस युनिव्हर्सला मॉडेल देतात तसं उत्तर', अशा शब्दात करीनाने तिची फिरकी घेतली होती.
कियारा-सिद्धार्थ लवकरच होणार बाबा
सिद्धार्थ-कियाराने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली होती. यामध्ये सिद्धार्थ-कियाराने हातात लहान बाळाचे शूज घेऊन छानसं फोटोशूट केलेलं दिसलं. हा सुंदर फोटो इनस्टाग्रामवर शेअर करत लवकरच ते आपल्या बाळाचं स्वागत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. "आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट..., लवकरच येत आहे...", अशा आशयाची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. कियाराच्या इच्छेनुसार या दोघांना खरंच जुळी मुलं झाली तर दुग्धशर्करा योग म्हणता येईल.