"आम्हाला लग्न करायचंच नव्हतं", आमिरसोबतच्या घटस्फोटानंतर किरण रावचा मोठा खुलासा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 11:56 IST2025-01-13T11:56:26+5:302025-01-13T11:56:59+5:30
घटस्फोट घेणं आमच्यासाठी खूपच सोपं होतं, असं किरण राव म्हणाली. त्याबरोबरच आम्हाला लग्न करायचंच नव्हतं, असा खुलासाही तिने केला.

"आम्हाला लग्न करायचंच नव्हतं", आमिरसोबतच्या घटस्फोटानंतर किरण रावचा मोठा खुलासा, म्हणाली...
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण राव हे बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल होतं. १६ वर्षांच्या सुखी संसारानंतर २०२१ मध्ये घटस्फोट घेत किरण आणि आमिर वेगळे झाले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किरण रावने याबाबत भाष्य केलं. घटस्फोट घेणं आमच्यासाठी खूपच सोपं होतं, असं ती म्हणाली. त्याबरोबरच आम्हाला लग्न करायचंच नव्हतं, असा खुलासाही तिने केला.
किरण रावने नुकतीच फिल्मफेअरला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, "आमच्यासाठी घटस्फोट घेणं सोपं होतं. आम्ही लग्नानंतर आमच्या नात्यावर खूप चांगल्या प्रकारे काम केलं होतं. घटस्फोटाचा निर्णयही खूप विचारपूर्वक घेतला होता. आम्ही कधी भांडलोदेखील नाही. जरी आमच्यात भांडण झालं तरी ते १२ तासात मिटायचं".
"आम्हाला लग्नदेखील करायचं नव्हतं. पण, याचा अर्थ असा नाही की आमचं प्रेम नाही किंवा आम्ही एकमेकांना आवडत नाही. प्रत्येक नात्यात पार्टनरच्या काही गोष्टी आपल्याला आवडतात तर काही गोष्टींचा राग येतो ज्यामुळे वाद होतात. पण, तरीही काही गोष्टी अशा असतात ज्यामुळे तुम्ही त्या माणसाशी लग्न करता", असंही किरण रावने सांगितलं.
पुढे तो म्हणाली, "तो माझा चांगला मित्र आहे. एक गुरू आहे. त्याने मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला आहे. पण, असे काही दिवस होते जेव्हा त्याच्या काही गोष्टींमुळे माझी चिडचिड व्हायची. पण, शेवटी तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवता हे तुमच्यावर आहे. तुम्हाला निगेटिव्ह भावना सोबत ठेवायची आहे की इतक्या वर्षांत रिलेशनशिपबाबतची चांगली गोष्ट? मी आमच्या नात्यातील चांगल्या गोष्टी सोबत ठेवायचं ठरवलं. आणि घटस्फोट घेत बाकीच्या गोष्टी सोडून दिल्या".