कॅन्सरनंतर अशी झाली किरण खेर यांची अवस्था; व्हिडीओत मुलाला म्हणाल्या, आता लग्न कर...!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 05:38 PM2021-06-03T17:38:15+5:302021-06-03T17:40:25+5:30
Kirron Kher Video : व्हिडीओत किरण खेर ब-याच अशक्त दिसत आहेत. पण त्यांच्या चेह-यावरचे चिरतरूण हास्य मात्र आजही कायम आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री व चंढीगड येथील भाजपाच्या खासदार किरण खेर (Kirron Kher ) सध्या कॅन्सरशी झुंज देत आहेत. नुकतीच त्यांची बोन सर्जरी पार पडली. तूर्तास किरण खेर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत कॅन्सरचा उपचार सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची झलक पाहायला मिळतेय. (Kirron Kher Video)
बुधवारी किरण खेर यांचा मुलगा सिकंदर खेर (Sikandar Kher) याने इन्स्टा लाईव्ह सेशन केले. या व्हिडीओत किरण खेर काऊचवर बसलेल्या दिसत आहेत. त्यांच्या डाव्या हातावर पट्टी बांधलेली दिसतेय. व्हिडीओत किरण खेर ब-याच अशक्त दिसत आहेत. पण त्यांच्या चेह-यावरचे चिरतरूण हास्य मात्र आजही कायम आहे.
68 वर्षांच्या किरण यांनी यादरम्यान चाहत्यांचे आभार मानलेत.
आता लग्न कर...
या व्हिडीओत सिकंदर, अनुपम व किरण तिघेही दिसत आहेत. मी माझ्या आईबाबासोबत बसलो आहे आणि तुम्ही मिसेस खेरला पाहू शकता, असे सिकंदर म्हणतो. यावर किरण खेर चाहत्यांना हॅलो करतात. यानंतर किरण मॅम आता आधीपेक्षा स्वस्थ आहेत, असे सांगत सिकंदर आईच्या चेह-यावर फोकस करतो. किरण खेर चाहत्यांचे आभार मानतात आणि सरतेशेवटी मुलाला म्हणजे सिकंदरला लग्न करण्याचा सल्ला देतात. काहीच महिन्यांत 41 वर्षांचा होणार आहेस. त्यामुळे आता तुला लग्न करायला हवे, असे किरण खेर म्हणतात.
68 वर्षांच्या किरण गेल्या 5 महिन्यांपासून मल्टीपल मायलोमा या आजाराशी झुंज देत आहेत. हा एकप्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. गेल्या 1 एप्रिलला किरण यांना कॅन्सर असल्याची बातमी पहिल्यांदा मीडियासमोर आली होती. पण त्याचे निदान गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्येच झाले होते.
गेल्या वर्षी 11 नोव्हेंबरला किरण खेर यांना चंदीगड येथील राहत्या घरी डाव्या हाताला दुखापत झाली होती. चंदीगडच्या पोस्ट ग्रॅच्युएट इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल एज्युकेशन अँड रिचर्स येथे त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या गेल्या होत्या. यावेळी त्यांना मल्टिपल मायलोमा झाल्याचे निदान झाले होते. हा कॅन्सर त्यांच्या डाव्या हातापासून उजव्या खांद्यापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे गेल्या 4 डिसेंबरला त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले होते.