Singer KK Passed Away: नवीन गाडी अन् मरीन ड्राइव्हची सैर ठरलेली असायची केकेची, हे आहे त्यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 12:36 PM2022-06-01T12:36:52+5:302022-06-01T12:37:12+5:30
Singer KK Passes Away: केकेचा एक किस्सा त्याच्या गाड्यांशी संबंधित आहे. केके जेव्हा नवीन कार घ्यायचा तेव्हा तो मरीन ड्राइव्हवर फिरायला घेऊन जायचा.
केके (Krishnakumar Kunnath) यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि सेलिब्रिटींमध्ये शोककळा पसरली आहे. त्याच्या स्मरणार्थ त्याचे चाहते सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. तेव्हापासून केकेचे अनेक किस्से आणि त्यांच्या जुन्या मुलाखती व्हायरल होत आहेत. यापैकी केके (कृष्णकुमार कुननाथ)चा एक किस्सा त्याच्या कार्सशी संबंधित आहे. केके जेव्हा नवीन कार विकत घ्यायचा तेव्हा तो मरीन ड्राइव्हवर फिरायला घेऊन यायचा. तो असं का करायचं हे तुम्हाला माहितीये का? यामागे इंटरेस्टिंग गोष्ट आहे.
खरेतर केकेचे कारसोबत स्पेशल कनेक्शन होते. केकेच्या मालकीच्या चार गाड्या होत्या आणि लहानपणापासूनच त्याला गाड्यांची आवड होती. या कनेक्शनमागे एक रंजक कथा आहे. केकेने सांगितले होते की, मला लहानपणापासूनच कारची आवड आहे. कारण माझे वडील मला कधीही गाडी चालवू देत नसत. गर्लफ्रेंडला कारमधून फिरवून आणण्यासाठी एकदा त्याने कारची डुप्लिकेट चावी साबणावर निशाण घेऊन बनवली होती, जी त्याने त्याच्या वडिलांपासून लपवून ठेवली. त्यानंतर वडिलांनी कारच्या चाव्या लपवून ठेवल्या होत्या.
त्याने पुढे सांगितले होते की, त्यावेळी आम्ही उन्हाळ्यात एसीशिवाय गाडीत फिरायचो. माझ्याकडे आता ४ गाड्या आहेत. मी अनेकदा लाँग ड्राईव्हवर जातो. मला आठवतंय मी मुंबईत आलो तेव्हा मरीन ड्राईव्हवर बसायला छान वाटायाचे. मी आणि ज्योती तिथे खूप जायचो. तिथे टॅक्सीतून लोक ये-जा करताना दिसायची. तेव्हा मला वाटायचं की मी गाडी घेतली तर इथे येईन. त्यामुळे मी आत्तापर्यंत खरेदी केलेल्या सर्व गाड्यातून मरीन ड्राइव्हला नक्की जातो. मी तिथे थोडा वेळ घालवतो आणि मग परत येतो. मरीना ड्राईव्हला गाडी घेऊन गेल्याने मला समाधान मिळते आणि माझ्यासाठी ते नॉस्टॅल्जियासारखे आहे.