रितेश देशमुखच्या संपत्तीचा आकडा जाणून तुम्हीही म्हणाल 'लय भारी'!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 12:09 PM2020-02-04T12:09:29+5:302020-02-04T12:14:12+5:30
‘मुंबई फिल्म कंपनी’ नावाची रितेशची स्वत:ची निर्मिती संस्था आहे. याअंतर्गत त्याने ‘लय भारी’, ‘माऊली’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली.
बॉलिवूडमध्ये काम करणा-या कलाकारांची लाइफस्टाइल, त्यांची महागडे शौक, त्यांच्या सगळ्याच गोष्टी सर्वसामान्य जनतेला आकर्षित करत असतात. सिनेमांसोबतच मॉडेलिंग, ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आणि जाहिरातींच्या माध्यमातून ही कलाकारमंडळी कोट्यवधी रुपये कमावतात. या कमाईचा आकडाही हा करोंडोंमध्ये असतोत. हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या रितेश देशमुखही करोंडोच्या संपत्तीचा मालक आहे. ‘रिपब्लिक वर्ल्ड’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, रितेशची संपत्ती १ कोटी साठ लाख डॉलर म्हणजेच जवळपास ११४ कोटी रुपये इतकी आहे. एका चित्रपटासाठी तो सर्वसाधारणपणे पाच ते सहा कोटी रुपये मानधन घेतो.
याशिवाय ‘मुंबई फिल्म कंपनी’ नावाची रितेशची स्वत:ची निर्मिती संस्था आहे. याअंतर्गत त्याने ‘लय भारी’, ‘माऊली’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. त्याला आलिशान गाड्यांची फार आवड असून त्याच्याकडे विविध कंपन्यांचे आलिशान कार आहेत. तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते हेच यावरून रितेशनेही सिद्ध करून दाखवलंय असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून रितेशने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या सिनेमात जेनेलिया त्याची हिरोईन होती. याच सिनेमाच्या निमित्ताने रितेश व जेनेलियाची पहिल्यांदा नजरानजर झाली होती. ‘तुझे मेरी कसम’नंतर ‘मस्ती’ या सिनेमात जेनेलिया व रितेश यांनी पुन्हा एकत्र काम केले. या सेटवर त्यांचे प्रेम अधिकच घट्ट झाले.
पण तरीही जेनेलिया लग्नासाठी तयार नव्हती. रितेश आज ना उद्या राजकारणात जाईल, असे तिला वाटत होते. त्यामुळे लग्नासाठी होकार द्यायला तिने तब्बल 8 वर्षे लावली. पण रितेशपासून दूर राहणे तिलाही शक्य नव्हते. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतलाच. 3 फेब्रुवारी 2012 विवाहबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली.