अभिनेत्री कोएना मित्राला कोर्टाने सुनावली सहा महिन्यांची शिक्षा, जाणून घ्या काय आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 12:16 PM2019-07-22T12:16:34+5:302019-07-22T12:26:40+5:30
अभिनेत्री कोएना मित्रा काही दिवसांपूर्वी ‘ओ साकी साकी रे’ या गाण्याच्या रिमेकमुळे चर्चेत आली होती. या गाण्याच्या रिमेकवर कोएनाने संताप व्यक्त केला होता. आता कोएनाबद्दल आणखी एक मोठी बातमी आहे.
अभिनेत्री कोएना मित्रा काही दिवसांपूर्वी ‘ओ साकी साकी रे’ या गाण्याच्या रिमेकमुळे चर्चेत आली होती. या गाण्याच्या रिमेकवर कोएनाने संताप व्यक्त केला होता. आता कोएनाबद्दल आणखी एक मोठी बातमी आहे. होय, एका मॉडेलचे पैसे परत न केल्याबद्दल कोएनाला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
चेक बाऊन्स प्रकरणी मुंबईच्या अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने कोएनाला दोषी ठरवत, तिला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. पूनम सेठी या मॉडेलने कोएनावर 22 लाख रूपये परत न केल्याचा आरोप केला आहे.
पूनमने 2013 साली चेक बाऊन्सप्रकरणी कोएनाविरोधात गुन्हा दाखल केला होता. कोएनाने त्यावेळी हे सर्व आरोप धुडकावून लावले होते. शिवाय हे प्रकरण न्यायालयात लढण्याचा इरादा व्यक्त केला होता. मला 22 लाख रूपये उधार देण्याइतकी पूनमची आर्थिक पत नाही, असे काय काय कोएना म्हणाली होती. याऊलट पूनमने कोएनावर चेक बाऊन्सचा आरोप केला होता. कोएनाने 22 लाखांपैकी 3 लाख परत करण्यासाठी मला चेक दिला होता. पण हा चेक बाऊन्स झाल्याचा दावा पूनमने केला होता.
19 जुलै 2013 रोजी पूनमने कोएनाला कायदेशीर नोटीस पाठवले होते. याऊपर कोएना पूनमच्या पैशांची परतफेड करू शकली नाही. त्यामुळे 10 ऑक्टोबर 2013 रोजी पूनमने कोएनाविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर कोएनाने पूनमवर चेक चोरल्याचा आरोप केला होता. कोएनाचे हे संपूर्ण आरोप न्यायालयाने अमान्य केले. शिवाय चेक बाऊन्स प्रकरणात कोएनाला 6 महिन्यांची शिक्षा ठोठावली.
कोएना म्हणते, मला फसवले जात आहे
हे संपूर्ण प्रकरण खोटे असून मला नाहक या प्रकरणात गोवले जात असल्याचे कोएनाचे म्हणणे आहे. अंतिम सुनावणीदरम्यान माझा वकील न्यायालयात हजर होऊ शकला नाही. त्यामुळे न्यायालयाने माझी बाजू ऐकून न घेताच निकाल दिला. मी या निकालाविरोधात उच्च न्यायालयात जाईल, असे तिने स्पष्ट केले आहे.