'क्रिश ४'मध्ये हृतिक रोशनसोबत 'या' अभिनेत्रीची एन्ट्री पक्की? राकेश रोशन यांनी दिली हिंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 12:31 IST2025-02-18T12:30:34+5:302025-02-18T12:31:19+5:30
'क्रिश ४'ची उत्सुकता शिगेला असून या सिनेमात राकेश रोशन एका दिग्गज अभिनेत्रीचं कास्टिंग करणार आहेत, अशी चर्चा आहे (krrish 4)

'क्रिश ४'मध्ये हृतिक रोशनसोबत 'या' अभिनेत्रीची एन्ट्री पक्की? राकेश रोशन यांनी दिली हिंट
'क्रिश' (krrish) सिनेमाचा स्वतःचा एक चाहतावर्ग आहे. 'क्रिश' सिनेमाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं प्रेम मिळवलंय. 'कोई मिल गया', 'क्रिश', 'क्रिश ३' अशा सिनेमांनी बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. हृतिक रोशनने या सिनेमात साकारलेली सुपरहिरोची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. आता लवकरच 'क्रिश ४' (krrish 4) हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात बॉलिवूडमधील एक दिग्गज अभिनेत्री झळकणार असल्याची हिंट स्वतः सिनेमाचे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी दिली आहे. कोण आहे ती?
'क्रिश ४'मध्ये दिसणार ही अभिनेत्री
काहीच दिवसांपूर्वी ओटीटी नेटफ्लिक्सवर 'द रोशन्स' नावाची डॉक्यूमेंट्री रिलीज झाली. या डॉक्यूमेंट्रीत रोशन कुटुंबाचा संघर्ष आणि यशाचा प्रवास दिसला. या डॉक्यूमेंट्रीची सक्सेस पार्टी नुकतीच साजरी करण्यात आली. राकेश रोशन यांनी ही पार्टी होस्ट केली होती. त्यावेळी दिग्गज अभिनेत्री रेखा सुद्धा या पार्टीत उपस्थित होत्या. पापाराझींनी राकेश रोशन यांना, रेखा 'क्रिश ४'मध्ये दिसणार का? असं विचारलं. त्यावेळी राकेश रोशन म्हणाले की, "सर्व काही क्रिश ४ मध्ये आहे. तुम्हाला अनेक गोष्टी बघायला मिळतील." एकूणच राकेश रोशन यांनी दिलेल्या हिंटवरुन हे लक्षात येईल की, 'क्रिश ४'मध्ये रेखा आहेत हे जवळपास निश्चित झालंय.
प्रियंका चोप्रा पुन्हा दिसणार?
'क्रिश ४' निमित्ताने सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवलेली लोकप्रिय अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार अशी चर्चा आहे. 'क्रिश' आणि 'क्रिश ३'मध्ये प्रियंका आणि हृतिकची जोडी चांगलीच गाजली. त्यामुळे 'क्रिश ४' निमित्ताने प्रियंका आणि हृतिक पुन्हा एकत्र दिसणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे. 'क्रिश ४'च्या कथेवर सध्या काम सुरु असून हा सिनेमा २०२६ ला रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.