Kumar Sanu birthday special : कुमार सानू या अभिनेत्रीच्या प्रेमात झाला होता वेडा, पत्नीला दिला होता घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 06:00 IST2019-09-23T06:00:00+5:302019-09-23T06:00:02+5:30
एका अभिनेत्रीसोबत सुरू असलेल्या कुमार सानूच्या अफेअरमुळे त्याच्या पहिल्या पत्नीने त्याला घटस्फोट दिला होता.

Kumar Sanu birthday special : कुमार सानू या अभिनेत्रीच्या प्रेमात झाला होता वेडा, पत्नीला दिला होता घटस्फोट
कुमार सानूचा आज वाढदिवस असून त्याने एकाहून एक सरस गाणी बॉलिवूडला दिली आहेत. कुमार सानूने 1986 पासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. हिरो हिरालाल या 1989 ला प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने त्याला एक प्रसिद्ध गायक म्हणून ओळख मिळवून दिली. कुमार सानूचे खरे नाव केदारनाथ भट्टाचार्य असून त्याने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्याचे नाव बदलले. त्याने आशिकी, साजन, दिवाना, बाजीगर, 1942: अ लव्ह स्टोरी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगली गाणी गायली आहेत. कुमार सानूला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याची सगळीच गाणी लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहेत.
कुमार सानूच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत राहिले आहे. कुमार सानूने दोन लग्न केली. रिटा आणि सलोनी असे त्याच्या पत्नींची नावे असून एका अभिनेत्रीसोबत सुरू असलेल्या त्याच्या अफेअरमुळे त्याच्या पहिल्या पत्नीने त्याला घटस्फोट दिला होता. जब कोई बात बिगड जाये हे मिनाक्षी शेषाद्रीवर चित्रीत करण्यात आलेले गाणे कुमार सानूने गायले असल्याचे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. याच कुमार सानू आणि मिनाक्षीचे अनेक वर्षं अफेअर होते. कुमार सानूची पहिली पत्नी रिटाने त्यांच्या घटस्फोटासाठी मिनाक्षीला जबाबदार धरले होते. १९९४ ला प्रकाशित झालेल्या फिल्मफेअर मासिकानुसार कुमारची पत्नी रिटाने घटस्फोटाची केस दाखल करताना मिनाक्षी त्यांच्या घटस्फोटासाठी कारणीभूत असल्याचे घटस्फोटाच्या कारणामध्ये लिहिले होते. फिल्मफेअरमध्ये ही बातमी आल्यानंतर या बातमीची चांगलीच चर्चा झाली होती. पण मिनाक्षीने यावर मौन राखणेच पसंत केले होते.
घटस्फोटाबद्दल रिटाने मीडियाशी बोलताना सांगितले होते की, मी गरोदर असताना कुमार सगळे पैसे मिनाक्षीवर उघळत होता. त्यावेळी माझ्याकडे एक रुपयादेखील नसायचा. मिनाक्षी आणि कुमार यांच्याविषयी सुरुवातीला मला कळल्यावर मिनाक्षीसारखी सुसंस्कृत मुलगी असे करू शकेल यावर माझा विश्वासच बनला नव्हता. पण नंतर मला सगळ्या गोष्टी हळूहळू करून कळायला लागल्या.
मिनाक्षी आणि कुमारमध्ये देखील काही काळानंतर दुरावा निर्माण झाला आणि कुमारने बिकानेरमध्ये राहाणाऱ्या सलोनीसोबत दुसरे लग्न केले. त्या दोघांना दोन मुली असून त्याच्या मोठ्या मुलीने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत 2014 मध्ये एक इंग्रजी म्युझिक अल्बम रिलिज केला होता.