किरण रावच्या 'लापता लेडीज'ची भारताकडून ऑस्करसाठी एन्ट्री, २९ सिनेमांमधून झाली निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 01:31 PM2024-09-23T13:31:21+5:302024-09-23T13:32:01+5:30
'लापता लेडीज' ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार
सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक 'ऑस्कर २०२५' (Oscars 2025) साठी भारताकडून एका चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने अधिकृत एन्ट्री म्हणून किरण राव (Kiran Rao) दिग्दर्शित 'लापता लेडीज' (Laapata Ladies) सिनेमाची निवड केली आहे. ९७ व्या अकादमी पुरस्कारासाठी हा सिनेमा भारताचं प्रतिनिधित्व करेल. सिनेमात स्पर्श श्रीवास्तव, नितांशी गोयल, प्रतिभा रांटा आणि रवी किशन यांनी भूमिका साकारली आहे.
'लापता लेडीज' १ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. लापता लेडीजने इतर सर्व सिनेमांना मागे टाकत ऑस्करसाठी एन्ट्री मिळवली आहे. 'हनुमान','कल्की 2898 ADट,'अॅनिमल','चंदू चॅम्पियन','सॅम बहादुर','स्वातंत्र्यवीर सावरकर'सह २९ सिनेमांमधून लापता लेडीजची निवड झाली आहे. किरण राव यांनी काही दिवसांपूर्वीच ही इच्छा व्यक्त केली होती आणि आता ती पूर्ण झाली आहे.
'लापता लेडीज' सिनेमाला थिएटरमध्ये फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे नवीन कलाकारांना घेऊन किरण राव यांनी या सरळ साधा सिनेमा बनवला. यातील नितांशी, स्पर्श आणि प्रतिभाच्या भूमिकेने प्रेक्षकांना प्रेमातच पाडलं. तर रवी किशन, छाया कदम यांच्या अभिनयाचीही खूप स्तुती झाली. टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्येही सिनेमाची स्क्रीनिंग झाली. आता ऑस्करसाठी सिनेमाची अधिकृतरित्या निवड झाली आहे. आमिर खान सिनेमाची निर्मिती केली. यावेळी तरी आमीरचं ऑस्करचं स्वप्न पूर्ण होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
ही आनंदाची बातमी ऐकताच सिनेमातील जया ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रतिभा रांटा म्हणाली, "ऑस्कर साठी लापता लेडीजची निवड झाल्याचं ऐकल्यावर माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. असं झालं तर माझं स्वप्नच पूर्ण होईल. या सिनेमाचा भाग असणं, यात काम करणं हा अप्रतिम प्रवास होता. हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळावा यासाठी मी खूप उत्सुक आहे. जया या भूमिकेसाठी मी स्वत:ला झोकून दिलं. त्यामुळे ही माझ्यासाठी अत्यंत खास भूमिका आहे. माझा पहिलाच सिनेमा ऑस्करसाठी पात्र ठरतो यातच सगळं काही आलं. निवड प्रक्रिया ही उत्कृष्ट सिनेमांनाच वर आणेल यावर मला विश्वास आहे आणि या संधीसाठी मी आभारी आहे. हा प्रवास कुठे जातोय हे पाहण्यासाठी मी आतुर आहे."