Lara Dutta Birthday Special : साजिद खानच्या वागणुकीला कंटाळून लारा दत्ताने पतीकडे केली होती तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 06:00 AM2019-04-16T06:00:00+5:302019-04-16T06:00:03+5:30
लारा दत्ताने साजिद खानने दिग्दर्शित केलेल्या हाऊसफुल या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता.
लारा दत्ताचा आज म्हणजेच १६ एप्रिलला वाढदिवस असून तिचा जन्म गाझियाबादमधील आहे. तिच्या कुटुंबियातील कोणीच बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित नाहीये. पण मिस युनिर्व्हस हा किताब मिळाल्यानंतर बॉलिवूडचे दार लारासाठी खुले झाले. तिने अंदाज या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दिला सुरुवात केली. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तिने आजवर मस्ती, नो एंट्री, पार्टनर यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. लारा लग्न झाल्यापासून खूपच कमी चित्रपटांमध्ये झळकते. ती तिचा जास्तीत जास्त वेळ पती आणि मुलीसोबत घालवते. तिचा वेलकम टू न्यूयॉर्क हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता.
लारा दत्ताने साजिद खानने दिग्दर्शित केलेल्या हाऊसफुल या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबतच अक्षय कुमार, रितेश देशमुख, दीपिका पादुकोण, जिया खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा रॉमँटिक कॉमेडी चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान घडलेल्या एका घटनेविषयी लारा दत्ताचे पती महेश भुपतीने मीडियाला सांगितले होते.
गेल्या काही महिन्यांपूर्वी मी टू या कॅम्पेनची सगळीकडेच चर्चा झाली होती. या कॅम्पेन अंतर्गत बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल बोलताना दिसल्या होत्या. याच दरम्यान महेश भुपतीने मीडियाशी बोलताना सांगितले होते की, हाऊसफुल या चित्रपटाच्या सेटवर साजिद खान माझ्यासोबत आणि आणखी काही अभिनेत्रींसोबत अतिशय वाईट वागतो. तसेच आमच्यासमोर अश्लील गोष्टी बोलतो अशी लाराने माझ्याकडे तक्रार केली होती. त्यावेळी आम्ही लंडनमध्ये होतो. तिथे लाराची एक हेअर ड्रेसर मैत्रीण तिला भेटायला आली होती. ती आणि लारा साजिदच्या वागण्याविषयी सतत बोलत होते. त्यावेळी मी लाराला बोललो होतो की, तुम्ही सगळे निमुटपणे सहन करत आहात. त्याच्या चित्रपटात काम करत आहात. त्यामुळे तुम्ही देखील या गोष्टीसाठी जबाबदार आहात. या माझ्या मताशी लारादेखील सहमत होती.