Lata Mangeshkar Passed Away: लता मंगेशकर यांचं खरं नाव आणि आडनावामागे आहे इंटरेस्टिंग स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 11:25 AM2022-02-06T11:25:29+5:302022-02-06T11:26:25+5:30
Lata Mangeshkar Passed Away: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. जगभरात त्यांचे असंख्य चाहते आहेत. मात्र त्यांचे खरे नाव आणि आडनावाबद्दलचा किस्सा फार कमी लोकांना माहित असेल
Lata Mangeshkar Passed Away: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रिच कॅण्डी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजाने करोडो लोकांना मंत्रमुग्ध केले होते. त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. आजही त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी लोकांना माहित नाहीत. जसे की त्यांच्या नावामागचा किस्सादेखील.
लता मंगेशकर यांचे लाखो-कोटी चाहते आहेत. मात्र त्यांच्यापैकी फार कमी लोक असतील ज्यांना त्यांच्या नावामागची खरी स्टोरी माहित असेल. खरेतर गायिकेच्या नावाचा किस्सा त्यांच्यासारखाच रंजक होता. लता मंगेशकर यांचे खरे नाव कुमारी लता दीनानाथ मंगेशकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित दिनानाथ मंगेशकर होते. त्यांचे वडील मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्य संगीतकार होते. त्यामुळे वारशात त्यांना संगीत ही कला मिळाली होती.
असे सांगितले जाते की, लता मंगेशकर यांच्या वडिलांना त्यांच्या वडिलांपेक्षा आईचा जास्त लळा होता. दीनानाथ यांच्या आई येसूबाई देवदासी होत्या. त्या गोव्यातील मंगेशी या गावात राहत होत्या. त्यादेखील मंदिरात भजन कीर्तन करून जीवन व्यतित करत होत्या. इथूनच दीनानाथ यांना मंगेशकर हे आडनाव मिळाले. जन्मावेळी लता यांचे नाव हेमा ठेवले होते. परंतु एकदा त्यांचे वडील दीनानाथ यांनी भावबंधन नाटकात काम केले. ज्यात एका महिला पात्राचे नाव लतिका होते. दीनानाथ मंगेशकर यांना हे नाव इतके आवडले की त्यांनी लगेच लेकीचं नाव हेमा बदलून लता ठेवले. ही तिच छोटी हेमा आहे, ज्यांना आज संपूर्ण जग लता मंगेशकर या नावाने ओळखते.