'लता मंगेशकर 'The Kashmir Files' चित्रपटात गाणार होत्या एक गाणं, पण...'; अग्निहोत्रींनी सांगितला किस्सा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 05:30 PM2022-03-22T17:30:44+5:302022-03-22T17:31:17+5:30

चित्रपटात दिवंगत भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर एक गाणं गाणार होत्या. पण ते शक्य होऊ शकलं नाही. 

lata mangeshkar promised to sing for the kashmir files says vivek agnihotri | 'लता मंगेशकर 'The Kashmir Files' चित्रपटात गाणार होत्या एक गाणं, पण...'; अग्निहोत्रींनी सांगितला किस्सा!

'लता मंगेशकर 'The Kashmir Files' चित्रपटात गाणार होत्या एक गाणं, पण...'; अग्निहोत्रींनी सांगितला किस्सा!

googlenewsNext

नवी दिल्ली- 

काश्मिरी पंडितांवर आधारित 'द काश्मिरी फाइल्स' हा चित्रपट पाहून प्रेक्षक अत्यंत भावूक होताना दिसून येत आहेत. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यावर राजकारणही चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. नव्वदच्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटातून दाखविण्यात आले आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळत असून बॉक्स ऑफिसवर 'द काश्मिर फाइल्स'नं जादू केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचंही खूप कौतुक केलं जात आहे. काही राज्यांनी चित्रपट 'टॅक्स फ्री' देखील केला आहे. चित्रपट इतका यशस्वी होताना दिसत असला तरी विवेक अग्निहोत्री यांना एका गोष्टीचं खूप दु:ख आहे. ते म्हणजे चित्रपटात दिवंगत भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर एक गाणं गाणार होत्या. पण ते शक्य होऊ शकलं नाही. 

चित्रपटात एक गाणं गाण्यासाठी लता मंगेशकर तयार होत्या, अशी माहिती खुद्द विवेक अग्निहोत्री यांनी दिली आहे. "चित्रपटाची कथाच इतकी दमदार होती की यात गाणं ठेवण्याची कोणतीही शक्यता आम्हाला दिसत नव्हती. तरीही चित्रपटात एक लोकसंगीत ठेवण्याचा निर्धार आम्ही केला होता. लता मंगेशकर यांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड केलं जावं अशी आमची इच्छा होती. आम्हाला माहित होतं की लतादीदी आता निवृत्त झाल्या आहेत. त्या चित्रपटांसाठी गात नाहीत. पण तरीही आम्ही लतादीदींकडे विनंती केली होती आणि त्यांनी होकारही दिला होता. माझी पत्नी पल्लवी लतादीदींच्या खूप जवळची व्यक्ती होती. सारंकाही ठीक सुरू होतं. एकदा कोरोना संपू देत. लॉकडाऊन हटू देत मग आपण रेकॉर्डिंग करू असं लतादीदींनी सांगितलं होतं. पण ते शक्य होऊ शकलं नाही आणि त्याआधीच दु:खद वार्ता समोर आली. त्यामुळे लतादीदींसोबत काम करू शकलो नाही याचं दु:ख नेहमीच राहील", असं विवेक अग्नीहोत्री यांनी म्हटलं आहे. 

विवेक अग्निहोत्रींचा चित्रपट देशभरात प्रचंड कमाई करत आहे. काहींनी चित्रपटावर टीका करत हा एक अजेंडा चित्रपट असल्याचं म्हणत आहेत. यावर विवेक यांनी स्पष्टीकरण देत चित्रपट पूर्णपणे सत्यावर आधारित असल्याचं सांगितलं आहे. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर 11 दिवसांत या चित्रपटानं सुमारे 180 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर चित्रपटाचं बजेट फक्त 25 कोटी इतकं होतं. या अर्थानं हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे.

'द काश्मीर फाईल्स' चित्रपट हरियाणा, गुजरात, गोवा, कर्नाटक, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. याशिवाय या चित्रपटानं इतक्या कमी वेळात उत्तम कलेक्शन केलं आहे. चित्रपट पाहण्यासाठी ज्या प्रकारे गर्दी होत आहे ते पाहता चित्रपट 300 कोटींचा आकडाही पार करेल असं मानलं जात आहे. या चित्रपटात अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यांनी भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: lata mangeshkar promised to sing for the kashmir files says vivek agnihotri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.