दिवंगत अभिनेता चिरंजीवी सरजाची पत्नी कोरोना पॉझिटीव्ह, नवजात बाळालाही संक्रमण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 11:13 AM2020-12-09T11:13:35+5:302020-12-09T11:15:35+5:30
स्वत: मेघनाने सोशल मीडियावर ही माहिती दिली. मेघनाचे आई, वडीलही करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत.
कन्नड सुपरस्टार चिरंजीवी सरजा याचे यावर्षी 7 जूनला हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वयाच्या उण्यापु-या 39 व्या वर्षी चिरंजीवी सरजाने जगाचा निरोप घेतला. चिरंजीवी या जगातून गेला तेव्हा त्याची पत्नी मेघना राज तीन महिन्यांची प्रेग्नंट होती. अलीकडे मेघनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. चिरंजीवीच्या प्रेमाची निशाणी असलेल्या या बाळाच्या आगमनाने सगळेच सुखावले होते. पण आता दिवंगत कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजा याची पत्नी मेघना राज आणि त्यांचा मुलगा करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
स्वत: मेघनाने सोशल मीडियावर ही माहिती दिली. मेघनाचे आई, वडीलही करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत.
‘माझे वडील, आई, मी आणि माझ्या मुलाला करोनाची लागण झाली आहे. आम्ही त्या सर्वांना ही माहिती देऊ इच्छितो जे गेल्या काही आठवड्यांत आमच्या संपर्कात आले आहेत. मी चिरू (चिरंजीवी सरजा) आणि माझ्या चाहत्यांना विनंती करते की कोणीही घाबरून जाऊ नका. आम्ही आता बरे आहोत आणि आमच्यावर उपचार सुरू आहेत. ज्यूनिअर सी देखील ठीक आहे. एक कुटुंब म्हणून आम्ही हे युद्ध लढत आहोत आणि जिंकूनच येऊ.’ असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
चिरंजीवी सरजा आणि मेघना यांनी 2 मे 2018 रोजी लग्न केले होते. हिंदू व ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला होता. 7 जून 2020 रोजी चिरंजीवी सरजावर काळाने झडप घातली. त्यावेळी मेघना तीनमहिन्यांची गर्भवती होती. या कठीण काळात अख्खे सरजा कुटुंबीय खंबीरपणे मेघनाच्या पाठीशी उभे राहिले.
चिरंजीवी सरजाने 2009 मध्ये वायूपुत्र या चित्रपटाद्वारे कारकिदीर्ची सुरुवात केली होती. त्याने 22 कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते. यातील अनेक चित्रपट हिट ठरले होते.
पतीच्या निधनानंतर मेघनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. ‘चिरु, मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण तुझ्यासाठी माझ्या मनात असलेल्या भावना मला शब्दात व्यक्त करता नाही येत. तुझे माझ्यावर प्रचंड प्रेम होते. त्यामुळे तू मला कधीही सोडून जाऊ शकला नाहीस. आपले मूल हे माझ्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट आहे. ते आपल्या प्रेमाची निशाणी आहे,’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले होते.
चिरंजीवीच्या अंत्यदर्शनाचे फोटो पाहून तुमचे डोळे देखील पाणावतील, पत्नीला सावरणे झाले होते कठीण
जहाँ तुम चले गये ! चिरंजीवी सरजाच्या निधनानंतर लग्नाचा व्हिडीओ होतोय व्हायरल