लग्नानंतर ११ व्या दिवशी पतीला चुकून लागली होती गोळी, 25 व्या वर्षीच विधवा झाल्या होत्या लीना चंदावरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 11:33 AM2019-08-29T11:33:15+5:302019-08-29T11:34:26+5:30
बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिवंगत अभिनेते-गायक किशोर कुमार यांच्या पत्नी लीना चंदावरकर यांचा आज वाढदिवस.
बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिवंगत अभिनेते-गायक किशोर कुमार यांच्या पत्नी लीना चंदावरकर यांचा आज वाढदिवस. त्या किशोर कुमार यांच्या चौथ्या पत्नी होत्या. लीना यांनी रूपेरी पडदा गाजवला. पण खासगी आयुष्यात मात्र त्यांना अनेक चढऊतार बघावे लागलेत.
लीना यांना बालपणीपासूनच अभिनेत्री बनायचे होते. शाळेत यावरूनच त्यांना शिक्षिकेचा मार खावा लागला होता. होय, मोठेपणी काय बनायचे? या विषयावर शिक्षिकेने एक निबंध लिहायला सांगितला होता. यावर मला मोठेपणी अभिनेत्री व्हायचे आहे, असे लीना यांनी लिहिले होते. यावरून त्यांच्या शिक्षिकेने लीना यांना जोरदार चोप दिला होता. कारण त्यााकाळी मुलींनी चित्रपटसृष्टीत योग्य समजले जात नव्हते.
अभिनेत्री व्हायचे स्वप्न लीना यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी घरातील सर्वांचा विरोध पत्करून एका टॅलेंट हंटमध्ये भाग घेतला आणि जिंकल्याही. पण जेव्हा मुंबईत आल्या. तेव्हा अल्पवयीन असल्याचे सांगून त्यांना काम नाकारण्यात आले. पुढे सुनील दत्त आणि नर्गीस यांच्या संपर्काने त्यांना ‘मन का मीत’ या चित्रपटात एक छोटीशी भूमिका मिळाली आणि त्यांचा बॉलिवूडमध्ये प्रवेश झाला.
1975 मध्ये लीना यांनी सिद्धार्थ बंडोडकर नावाच्या तरूणाशी ओळख झाली आणि दोघांनी लग्न केले. पण लग्नाच्या 11 व्या दिवशीच लीना यांच्या पतीला चुकून गोळी लागली. काही महिने त्यांच्यावर उपचार चालले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. लीना त्यावेळी केवळ 25 वर्षांच्या होत्या. वयाच्या 25 व्या वर्षीच त्या विधवा झाल्या.
पतीच्या निधनानंतर लीना डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. त्यांचे पिता त्यांना माहेरी घेऊन आलेत. पण माहेरी जे कुणी येत, ते लीना यांच्याकडे विचित्र नजरेतून बघत. हे लीना यांना सहन होत नसे. अखेर त्यांनी मुंबईला परतण्याचा आणि पुन्हा चित्रपटांत काम करण्याचा निर्णय घेतला.
मुंबईत पुन्हा काम केल्यानंतर याचदरम्यान किशोर कुमार यांच्याशी त्यांची भेट झाली आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. लीनाच्या वडिलांना हे लग्न मान्य नव्हते. कारण लीना व किशोर यांच्यात 22 वर्षांचे अंतर होते. शिवाय किशोर यांची आधीच तीन लग्ने झाली होतीत. पण लीना पहिल्या पतीच्या निधनाने आतून तुटल्या होत्या. तर किशोर कुमार तिन्ही लग्न अपयशी झाल्याने निराश होते. एकार्थाने किशोर कुमार व लीना दोघेही समदु:खी होते. त्याचमुळे कुणाचीही पर्वा न करता दोघांनी लग्न केले. दोघांनाही सुमीत कुमार नावाचा मुलगा आहे.
लग्नाच्या काही वर्षांतच किशोर कुमार यांचेही निधन झाले. लीना आजही किशोर कुमार यांच्या आठवणीत आयुष्य व्यतीत करत असून त्यांच्या कुटुंबीयांसोबत मुंबईत वास्तव्याला आहेत.