प्यार किया तो डरना क्या: शापित सौंदर्यकन्या मधुबालाची प्रेमप्रकरणे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2017 10:11 AM2017-02-02T10:11:36+5:302017-02-02T15:41:36+5:30

मधुबाला म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले स्वप्न. भारतीय सौंदर्याचा प्रवास मधुबाला यांच्याजवळ येऊन थांबतो. अत्यंत सुंदर रूप घेऊन जन्माला आलेल्या ...

Love is so scared: Cursed beauties love Madhubala love affairs | प्यार किया तो डरना क्या: शापित सौंदर्यकन्या मधुबालाची प्रेमप्रकरणे

प्यार किया तो डरना क्या: शापित सौंदर्यकन्या मधुबालाची प्रेमप्रकरणे

googlenewsNext
ुबाला म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले स्वप्न. भारतीय सौंदर्याचा प्रवास मधुबाला यांच्याजवळ येऊन थांबतो. अत्यंत सुंदर रूप घेऊन जन्माला आलेल्या मधुबाला यांची कारकीर्द मात्र शापित ठरली. त्यांना हवं ते मिळाले नाही. आयुष्य कुढत काढावे लागले. त्यांचे नाव दिलीपकुमारशी जोडले गेले. या दोघांचे लग्न होऊ शकले नाही. हीच भावना आयुष्यभर त्यांच्या मनात राहिली. त्यांना हवं ते प्रेम मिळू शकले नाही. शापित अभिनेत्री म्हणूनच त्यांच्याकडे पाहावे लागेल. त्यांच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांविषयी...



दिलीपकुमार
पठाण घरात जन्माला आलेल्या मधुबाला वयाच्या १७ व्या वर्षी पठाण घराण्यातील दिलीपकुमार यांना भेटल्या. अर्थात त्यांचे वडील अयातुल्ला खान या दोघांमध्ये उभे राहिले. मधुबाला आणि दिलीपकुमार यांचे लग्न झाले तर आपला आर्थिक स्रोत संपेल, या भीतीने त्यांच्या वडिलांनी विरोध केला. केवळ सेटवरच या दोघांना भेटता येत होते. अशाही स्थितीत या दोघांचे प्रेम कित्येक वर्षे फुलले. नया दौर चित्रपटाचे भोपाळमध्ये ४० दिवस शूटिंग होणार होते. या चित्रपटासाठी बी. आर. चोप्रा यांनी आगावू रक्कमही दिली होती. मधुबालाचे वडील यांनी हे ठिकाण योग्य नसल्याचे कारण देऊन जाण्यास नकार दिला. मधुबाला आपल्या वडिलांच्या आग्रहाबाहेर नव्हत्या. त्यांनी नकार दिला. चोप्रा यांनी मधुबाला हिच्याऐवजी वैजयंतीमाला यांना घेतले. हे प्रकरण न्यायालयात गेले. दिलीपकुमार यांनी आपले मधुबाला यांच्यावर प्रेम असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मधुबाला आणि दिलीपकुमार यांच्यातील प्रेमप्रकरण संपुष्टात आले. अशातही या दोघांनी के. आसिफ यांचा मुघल-ए-आझम चित्रपट पूर्ण केला. या चित्रपटातील अनारकली ही सलीमला सोडण्यास तयार नसते. अगदी तशीच स्थिती मधुबालांची होती.
 
झुल्फीकार अली भुट्टो
पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फीकार अली भुट्टो हे मधुबाला यांचे प्रचंड फॅन होते. मधुबाला यांना पाहताच ते त्यांच्या प्रेमातच पडले. मधुबाला यांना भेटण्यासाठी ते वारंवार मुंबईत यायचे. लारकाना आणि कराची या दोन शहरांदरम्यान त्यांनी शटल विमानसेवा सुरू केली होती. मधुबाला भेटल्यानंतर त्यांनी मुंबईलाही सेवा सुरू केली. भुट्टो यांनी इराणी मुलगी नुसरत (बेनझीर भुट्टो यांच्या आई) यांच्याशी विवाह केलेला होता. भुट्टो आणि मधुबाला यांच्या वारंवार भेटी व्हायच्या. पुढे भुट्टो हे पाकिस्तानमध्ये राजकारणात गेले. १९७२ साली ते पंतप्रधान झाले. या दोघांमध्ये काय नाते होते, हे शेवटपर्यंत कळू शकले नाही. मधुबालांच्या डायरीतच याची नोंद होती. त्यांच्या वडिलांनी कबरीतच डायरीही ठेवली. त्यांच्यासोबतच हे सारे ‘राज’ गाडले गेले.



किशोरकुमार
दिलीपकुमार यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर मधुबाला यांच्या लक्षात आले की, आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. आयुष्याच्या शेवटच्या क्षणात कोणीतरी हवे म्हणून गायक किशोरकुमार यांच्यासोबत विवाह केला. लग्नाच्यावेळी किशोरकुमार यांच्या आर्थिक अडचणी होत्या. आयकर विभागाने त्यांच्याकडे असणाºया करापोटी त्यांची मालमत्ता विक्रीस काढण्याचे ठरविले होते. किशोरकुमारना वाटले मधुबाला यांच्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. मधुबाला यांच्या आरोग्याच्या प्रश्नामुळे किशोरकुमारना लक्ष देण्यास वेळच मिळाला नाही. या दोघांचे लग्न झाले तरी त्यांच्यात प्रचंड तणाव आणि वाद होता. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी वयाच्या ३६ व्या वर्षी मधुबाला यांचे निधन झाले. विशेष म्हणजे त्यानंतर किशोरकुमार यांची भरभराट झाली. 
किदार शर्मा
दिग्दर्शक किदार शर्मा यांनी मधुबाला यांना पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी दिली. ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा मधुबाला यांना पाहिले, त्यावेळी ते त्यांच्या प्रेमात पडले. त्यावेळी मधुबाला खूप लहान होत्या. प्रेम म्हणजे काय, हे कळण्याचे त्यांचे वय नव्हते. आयुष्यात आणखी काळ वाट पाहिली तर आपल्याला हवा तसा नवरा मिळू शकेल, अशी त्यांची धारणा होती. चांगले दिग्दर्शक म्हणून मधुबाला यांनी किदार शर्मा यांच्याकडे पाहिले.
कमाल अमरोही
दिग्दर्शक कमाल अमरोही हे मधुबाला यांच्या प्रेमात पडले होते. मधुबाला यांनी परिधान केलेला दुपट्टा घेऊनच ते वावरायचे. मधुबालाही कमाल यांच्याकडे प्रेमाने पाहायच्या. महल या चित्रपटाचे दिग्दर्शन ते करीत होते. महल हा चित्रपट १९४९ साली प्रदर्शित झाला. त्यानंतरही या दोघांमधील प्रेम कायम होते. मधुबाला यांच्या वडिलांनाही हे मंजूर होते. कमाल यांचे पहिले लग्न झाले होते. पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याविषयी मधुबाला यांनी सांगितले. त्यांनी यासाठी काही लाख रुपये देऊ, असे सांगितले. त्यावर आपण संवाद, चित्रपट विकू पण पत्नीला विकणार नाही, असे कमाल अमरोही यांनी सांगितले. त्यानंतर या दोघांमध्ये वाद होऊन त्यांचे ब्रेकअप झाले.



प्रेमनाथ
बादल या चित्रपटात मधुबाला यांचे हिरो म्हणून प्रेमनाथ होते. शूटिंगच्या पहिल्या दिवशी मधुबाला प्रेमनाथ यांच्या मेकअप रुममध्ये गेल्या. त्यांना गुलाबाचे फूल देत एक चिठ्ठी दिली. त्यात असं लिहिले होते, तुम्हाला माझे प्रेम कबूल असेल तर हे फूल तुम्ही स्वीकाराल. भारतामधील सर्वांत सुंदर महिला आपले प्रेम देत असल्याचे पाहून प्रेमनाथना काहीच सुचेना. प्रेमनाथ यांनी ते फूल स्वीकारले आणि मधुबाला यांना कबूल है कबूल है असे म्हटले. मधुबाला आणि प्रेमनाथ यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. अर्थात काही दिवसांतच मधुबाला त्यांच्याशी फटकून वागू लागल्या. काही दिवसांनंतर प्रेमनाथ यांना कळाले की, मधुबाला यांनी अशोककुमार यांनाही गुलाबाचे फूल देऊन चिठ्ठी दिली होती. यामुळे प्रेमनाथ यांनी मधुबालाचा चेहरादेखील पाहायचे नाही, असे ठरविले.
लतीफ
लतीफ हे दिल्लीत राहायचे. ते मधुबाला यांचे बालपणाचे मित्र. ज्यावेळी मधुबाला यांनी दिल्लीहून मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी लतीफ अत्यंत भावनिक झाले होते. मुंबईला जाण्यापूर्वी मधुबाला यांनी लतीफ यांना गुलाबाचे फूल दिले. प्रेमाचे हे प्रतीक लतीफ यांनी आयुष्यभर सांभाळले. मधुबाला वारल्यानंतर त्यांनी हे फूल त्यांच्या कबरीवर वाहिले. २३ फेब्रुवारी या मधुबाला यांच्या पुण्यतिथीस ते येऊन गुलाबाचे फूल अर्पण करुन जायचे.

मधुबाला यांना आपल्या आयुष्यात आदर्श पत्नी म्हणून राहायचे होते. हे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी हे सारे क्षणभंगुर असते, हे त्यांच्या लक्षात आले. अर्थात २३ फेब्रुवारी १९६९ साली त्यांचे निधन झाले असले तरी त्या अजूनही तितक्याच लोकप्रिय आहेत. सौंदर्याची परिभाषा ज्यावेळी सांगायची असते किंवा सौंदर्याची व्याख्या करायची असते, त्यावेळी पहिले नाव मधुबाला यांचेच येते.

Web Title: Love is so scared: Cursed beauties love Madhubala love affairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.