'ब्राह्मण' शब्द 'इब्राहिम' वरुन आला? या वादग्रस्त पोस्टनंतर लकी अलीने मागितली माफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2023 09:33 AM2023-04-12T09:33:24+5:302023-04-12T09:35:11+5:30
ब्राम्हण इब्राहिमचे वंशज अशा आशयाची वादग्रस्त पोस्ट लकी अलीने केली होती.
'ओ सनम' फेम गायक लकी अलीचा (Lucky Ali) चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या लाईव्ह शोंना तुफान गर्दी होते. हटके आणि प्रेमात पाडणारी अशी त्याची गाणी असतात. त्याने गायलेलं ओ सनम हे गाणं आजही तरुणांच्या सर्वात आवडीचं गाणं आहे. मात्र लकी अली आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. ते कारण म्हणजे त्याने नुकतेच केलेलं एक वादग्रस्त विधान. 'ब्राम्हण' (Brahmin) हा शब्द ' इब्राहिम' (Ibrahim) वरुन आला आहे अशा आशयाची पोस्ट त्याने लिहीली होती. आपल्यावर चौफेर टीका झाल्याचं दिसताच लकी अलीने आता माफी मागितली आहे तसंच ती पोस्टही डिलीट केली आहे.
दोन दिवसांपूर्वी लकी अलीने फेसबुकवर एक पोस्ट केली. त्यात त्याने लिहिले, 'ब्राम्हण' हा शब्द 'ब्रम्हा' पासून आला आहे तर तर 'ब्रम्हा' हा शब्द 'अबराम' पासून आणि 'अबराम' हा शब्द 'अब्राहम' किंवा 'इब्राहिम' पासून आला आहे. ब्राम्हण हे इब्राहिमचे वंशज. इब्राहिम...राष्ट्रपिता. मग विनाकारण एकमेकांमध्ये का भांडता?
लकी अलीच्या या पोस्टनंतर त्याच्यावर बरीच टीका झाली. आपली चूक झाली आहे हे लक्षात येताच लकीने नवीन फेसबुकपोस्ट करत माफी मागितली आहे. लकीने लिहिले,'प्रिय मित्रांनो, मागच्या एका पोस्टमुळे वाद झाला आहे हे मला कळतंय. कोणाला राग येईल किंवा कोणाच्या भावना दुखावतील असा माझा हेतू मुळीच नव्हता. उलट सर्वांनी एकत्र यावं हा माझा हेतू होता. पण मला हवं तसं ते झालं नाही. यापुढे मी सोशल मीडियावर काहीही लिहिण्याच्या आधी सतर्क राहीन कारण मला दिसतंय की माझ्या हिंदू भाऊबंधांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यासाठी मी माफी मागतो.'
लकी अली तरुणांमध्ये खूपच प्रचलित आहे. जगभरात त्याचे परफॉर्मन्स होतात. एक काळ होता जेव्हा त्याची प्रचंड क्रेझ होती. आज लकी अलीचं वय 64 वर्षे आहे तरी त्याच्या गाण्यांची जादू कायम आहे.