किसिंग सीनमुळे नीना गुप्ता यांचे झाले हाल; डेटॉलने धुवावा लागला होता चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 05:48 PM2023-06-29T17:48:46+5:302023-06-29T17:49:43+5:30
Neena gupta: हा अनुभव त्यांच्यासाठी प्रचंड वाईट होता, असं त्यांनी सांगितलं.
प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफविषयीदेथील बेधडकपणे व्यक्त होणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. काही काळापूर्वीच नीना गुप्ता यांचं सच कहूँ तो हे आत्मचरित्र प्रकाशित झालं. या आत्मचरित्रामध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील अनेक गुपितं उघड केली. त्यामुळे मध्यंतरी त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. यामध्येच सध्या त्यांची एक मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी किसिंग सीनवेळी घडलेला एक किस्सा सांगितला आहे.
अलिकडेच नीना गुप्ता यांनी ‘लस्ट स्टोरीज २’च्या निमित्ताने एक मुलाखत दिली. लस्ट स्टोरीज २ सध्या त्याच्यातील बोल्ड सीनमुळे चर्चेत येत आहे. त्यामुळे या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या किसिंग सीनविषयी भाष्य केलं. एका मालिकेत किसिंग सीन दिल्यानंतर त्यांची कशी अवस्था झाली होती हे त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे किसिंग सीन दिल्यानंतर त्यांनी चक्क अँटीसेप्टिकने त्यांचा चेहरा धुतला होता असं सांगितलं.
काही वर्षांपूर्वी नीना गुप्ता यांनी एका मालिकेसाठी अभिनेता दिलीप धवन यांच्यासोबत किसिंग सीन दिला होता. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदाच किसिंग सीन दिला होता. हा अनुभव त्यांच्यासाठी प्रचंड वाईट होता असं त्यांनी सांगितलं. तसंच रात्रभर झोपू सुद्धा शकले नाही असंही त्या म्हणाल्या.
‘त्या सीननंतर मी रात्रभर झोपले नाही. तो काही माझा जवळचा मित्र नव्हता. आम्ही फक्त एकमेकांना ओळखायचो. तो चांगला दिसायचा पण त्याने काही फरक पडणार नव्हता. कारण, त्या सीनसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मी तयार नव्हते. त्यावेळी तो सीन करताना मी खूप तणावाखाली होते.पण, तो सीन करण्यासाठी मी स्वत:ला तयार केलं. मात्र, हा सीन झाल्यावर मी डेटॉलने तोंड धुतलं. ज्या व्यक्तीला मी नीट ओळखतही नव्हते अशा व्यक्तीला मला किस करणं माझ्यासाठी फार कठीण होतं, असं नीना गुप्ता म्हणाल्या.
दरम्यान, त्या काळात किसिंग सीन देणं ही फार मोठी गोष्ट होती. त्यावेळी संपूर्ण कुटुंब एकत्र बसून मालिका पाहायचे. त्यामुळे या सीनला प्रचंड विरोध झाला. अखेर मालिकेतून हा सीन हटवण्यात आला.