अवघ्या दीड कोटीत तयार झाला होता ‘चांदनी बार’, त्यापेक्षा जास्त खर्च करिनाच्या कपड्यांवर झाला होता...!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 07:29 PM2021-09-28T19:29:09+5:302021-09-28T19:32:14+5:30
‘चांदनी बार’ हा मधुर भांडारकर यांचा एक यादगार सिनेमा. 2001 साली आजच्याच दिवशी म्हणजे 28 सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज झाला होता.
‘चांदनी बार’ (Chandni Bar) हा मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांचा एक यादगार सिनेमा. 2001 साली आजच्याच दिवशी म्हणजे 28 सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज झाला होता. आज हा सिनेमा रिलीज होऊन 20 वर्षे पूर्ण झालीत. अर्थात हा सिनेमा कधीच जुना होणारा नाही़.
सिनेमाच्या रिलीजला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मधुर भांडारकर यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ‘चांदनी बार’च्या अनेक आठवणी शेअर केल्यात. चित्रपटाच्या निर्मितीकाळातील काही आठवणी त्यांनी सांगितल्या. विशेषत: सिनेमाच्या बजेटवर ते भरभरून बोलले. या सिनेमाचा बजेट इतका कमी होता की, करिनाच्या (Kareena Kapoor) ‘हिरोईन’मधील (Heroine) कपड्यांचा खर्च त्यापेक्षा अधिक होता.
होय,‘चांदनी बार’च्या संपूर्ण बजेटपेक्षा जास्त खर्च तर ‘हिरोईन’ सिनेमातील करीनाच्या कपड्यांवर झाला होता.
मुलाखतीत मधुर भंडारकर म्हणाले, ‘माझा पहिला सिनेमा फ्लॉप झाला होता. अशात चांदनी बार बनवणं, हे खूप जोखमीचे होतं. लोकांचा चांदनी बार या नावावरही आक्षेप होता. अनेकांना हा सिनेमा अत्यंत खालच्या दर्जाचा आणि बी ग्रेड असल्याचं वाटलं. पण मी जवळपास सहा महिने या सिनेमावर संशोधन केलं होतं. पहिला सिनेमा अपयशी झाल्यानं माझ्यावर दडपण होत़ं. पण मला हवा तसाच सिनेमा बनवणार, यावर मात्र मी ठाम होतो. मी सहा महिने तहानभूक विसरून या सिनेमावर काम केलं. या सिनेमाची कल्पना घेऊन मी निर्मात्यांकडे गेलो तेव्हा त्यांनी यात आयटम साँग टाकण्याची मागणी केली. पण मला हे मान्य नव्हतं. मला माझ्याच आवडीचा, माझ्याचं मनासारखा सिनेमा बनवायचा होता. मी अगदी कमी बजेटमध्ये सिनेमा बनवला. या सिनेमाचं बजेट इतकं कमी होतं की एकदा मी करीनाला एकदा विनोदात म्हणालो होती की, मी तुझ्या ‘हिरोईन’ सिनेमातील कपड्यांवर जितके पैसे खर्च केलेत, त्यापेक्षा कमी माझ्या ‘चांदनी बार’चा बजेट होता.’
‘चांदनी बार’मध्ये मुंबईच्या एका बार डान्सरची कथा दाखवली आहे. तब्बू (Tabu) ही यात लीड रोलमध्ये होती. अगदी तिला डोळ्यासमोर ठेवूनच मधुर यांनी हा सिनेमा बनवला होता. ‘चांदनी बार’साठी तब्बू ही माझी पहिली आणि शेवटची पसंत होती. तिने हा सिनेमा करायला नकार दिला असता तर मी निराश झालो असतो, असे मधुर भांडारकर म्हणाले ते म्हणूनच...
‘चांदनी बार’ या सिनेमाला चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.या सिनेमानंतर वास्तववादी सिनेमा बनवणारे दिग्दर्शक म्हणून मधुर भांडारकर यांची ओळख निर्माण झाली.