या अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती माधुरी दीक्षित, पण या कारणामुळे होऊ शकले नाही लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 06:00 AM2020-05-15T06:00:00+5:302020-05-15T14:28:10+5:30
माधुरी या अभिनेत्यासोबत लग्न देखील करणार होती. पण त्या अभिनेत्याच्या आयुष्याला अचानक मिळालेल्या एका विचित्र वळणामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही.
माधुरी दीक्षितने बॉलिवूडवर अनेक वर्षं राज्य केले. प्रेक्षकांच्या या लाडक्या धकधक गर्लने एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. दिल, दिल तो पागल है, हम आपके है कौन, बेटा, पुकार यांसारख्या अनेक चित्रपटात माधुरीने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आणि तिच्या या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर देखील घेतल्या. माधुरीचा आज वाढदिवस असून गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांमध्ये ती खूपच कमी काम करतेय. ती अधिकाधिक वेळ तिच्या कुटुंबियांना देते. तिचे लग्न डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत झाले असून तिला दोन मुलं आहेत. तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला आपल्याला अनेकवेळा तिचे तिच्या कुटुंबियांसोबतचे फोटो पाहायला मिळतात. माधुरी प्रसिद्धीझोतात असताना एका अभिनेत्यासोबतचे तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. ती या अभिनेत्यासोबत लग्न देखील करणार होती. पण त्या अभिनेत्याच्या आयुष्याला अचानक मिळालेल्या एका विचित्र वळणामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही.
संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असून ते लग्न करणार असल्याच्या बातम्या देखील नव्वदीच्या दशकात ऐकायला मिळाल्या होत्या. १९९३ ला झालेल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये संजय दत्तचे नाव आले आणि तेव्हापासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. आज संजय आणि माधुरी हे आपापल्या आयुष्यात खूश असून संजयचे मान्यतासोबत तर माधुरीचे डॉ. श्रीराम नेनेसोबत लग्न झाले आहे.
संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांची प्रेमकथा कधी सुरू झाली याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. संजू आणि माधुरी यांनी साजन या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या यायला लागल्या. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ते दोघे प्रेमात पडले असे म्हटले जाते. संजय आणि माधुरीच्या नात्याविषयी लेखक यासिर उस्मान यांनी संजय दत्तः द क्रेझी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवूड्स बॅड बॉय या पुस्तकात नमूद केले होते की, संजय दत्तची पहिली पत्नी रिचा कॅन्सरच्या उपचारासाठी न्यूयॉर्कला असताना तिला माधुरी आणि संजच्या अफेअरविषयी तिला कळले. त्यावेळी तिच्या तब्येतीत पहिल्यापेक्षा खूप सुधारणा झाली होती. पण मीडियातील बातम्या वाचून तिला काहीही करून भारतात परतायचे होते आणि आपला संसार वाचवायचा होता.
रिचा काहीच महिन्यांनंतर त्यांची मुलगी त्रिशालासोबत भारतात परतली. तिचा आजार बरा झाला होता. पण संजय तिला टाळू लागला होता. सिनेब्लिझ्टला दिलेल्या मुलाखतीत तर रिचाच्या बहिणीने सांगितले होते की, रिचा आणि त्रिशालाला विमानतळावर घ्यायला देखील संजय त्यावेळी गेला नव्हता. रिचा परतली तोपर्यंत संजय पूर्णपणे बदलला होता. त्यामुळे १५ दिवसांतच ती पुन्हा न्यूयॉर्कला परतली आणि रिचाने संजयला घटस्फोट देण्याचे ठरवले. पण त्याच काळात तिचा कॅन्सर उलटला आणि तिची तब्येत ढासळत गेली आणि यातच तिचे निधन झाले.