Madhuri Dixit : आप एक-दो-तीन हैं न? जेव्हा सुपरस्टार झालेल्या माधुरीनं आयुष्यात पहिल्यांदा ऑटोग्राफ दिला...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 08:00 AM2022-07-25T08:00:00+5:302022-07-25T08:00:01+5:30
Madhuri Dixit : ‘तेजाब’ प्रदर्शित झाल्यानंतर सुमारे महिनाभरानंतर माधुरी अमेरिकेतून भारतात परत आली आणि विमानतळावरच तिला काहीतरी वेगळं जाणवू लागलं...
‘मोहिनी’ म्हटलं तरी एकच चेहरा आपल्या डोळ्यांपुढे येतो, तो म्हणजे माधुरीचा. होय, तमाम चाहत्यांना वेड लावणारी माधुरी दीक्षितने ( Madhuri Dixit ) 1972 साली ‘अबोध’ या चित्रपटातून डेब्यू केला. पण तिचा पहिलाच सिनेमा दणकून आपटला. यापाठोपाठ आलेले आवारा बाप, हिफाजत, उत्तर दक्षिण, मोहरे असे चार पाच सिनेम्यांचीही तिच गत झाली. यानंतर आला ‘तेजाब’ आणि या एका सिनेमानं माधुरीनं सर्वांवर जणू मोहिनी घातली. या चित्रपटातील मोहिनीची भूमिका माधुरीनं अक्षरश: जगली. चित्रपटातील ‘एक दोन तीन’ या गाण्याने माधुरी चाहत्यांच्या हृदयाची राणी झाली. तिच्या सौंदर्यानं प्रत्येकाला वेड लावलं. पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने जणू धुमाकूळ घातला. चित्रपटगृहांबाहेर अक्षरश: लोकांच्या रांगा लागल्या.
इकडे ‘तेजाब’वर लोकांच्या उड्या पडत होत्या तर तिकडे माधुरी अमेरिकेत तिच्या बहिणीच्या लग्नात बिझी होती. त्यावेळी आत्ता सारखा सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे ‘तेजाब’ सुपरहिट झालाये, हे माधुरीच्या ध्यानीमनीही नव्हते. नाही म्हणायला, तिच्या सेक्रेटरीने सिनेमा हिट झाल्याचे तिला फोनवरून कळवले होते. पण माधुरीने ते फार काही मनावर घेतले नव्हते. कारण आत्तापर्यंत पाच-सहा सिनेमे दणकून आपटले होते आणि अपयशाची जणू तिला सवय झाली होती. हा सिनेमाही आठवडाभर चालेल आणि उतरेल, असे तिला वाटले होते.
‘तेजाब’ प्रदर्शित झाल्यानंतर सुमारे महिनाभरानंतर माधुरी अमेरिकेतून भारतात परत आली आणि विमानतळावरच तिला काहीतरी वेगळं जाणवू लागलं. लोक तिच्याकडे वळूवळू पाहत होते. आपआपसात कुजबूजत होते. माधुरीसाठी हा प्रकार नवा होता.
विमानतळाच्या बाहेर आल्यावर माधुरी तिच्या कारमध्ये बसली आणि कार धावू लागली. बघते काय तर रस्त्याच्या दुतर्फा माधुरीच्या ‘तेजाब’चे मोठ मोठे होर्डिंग्स लागले होते. त्यावर माधुरी झळकत होती. माधुरीसाठी हा सुखद धक्का होता.
अशाच सिग्नलवर तिची गाडी थांबली आणि फुलं विकणारा एक पोरगा तिच्याकडे टकमक पाहत होता. शेवटी त्याला राहावलं नाहीच. त्याने माधुरीच्या कारच्या काचेवर टकटक केलं. तिने काच खाली केली आणि तो पोरगा डोळे फाडून नुसता बघत राहिला. आप एक दो तीन... हो ना? ऑटोग्राफ दिजीऐ, असं म्हणत त्याने एक कागद व पेन माधुरीसमोर केला. हा माधुरीनं दिलेला पहिला ऑटोग्राफ होता. माधुरी आत्ता कुठे स्टार झाली होती...
माधुरीने एका मुलाखतीत पहिल्या ऑटोग्राफचा हा किस्सा सांगितला होता. त्या ऑटोग्राफनंतर ती स्टार झाली होती...