माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने बनवल्या पुरणपोळ्या! व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 03:17 PM2024-03-26T15:17:18+5:302024-03-26T15:19:21+5:30
डॉ. श्रीराम नेने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.
बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी माधुरी दीक्षित सध्या सतत चर्चेत असते. काही वर्षांपूर्वीच माधुरी तिच्या कुटुंबासह अमेरिकेतून पुन्हा भारतात स्थायिक झाली आहे. भारतात आल्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीतही कमबॅक केलं आहे. शिवाय तिचे पती डॉ श्रीराम नेनेही आजकाल लाईमलाईटमध्ये असतात. सध्या श्रीराम नेने यांचा पुरणपोळ्या बनवतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये डॉ नेनेंचे आई वडीलही दिसून येत आहेत.
डॉ. श्रीराम नेने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. अनेकदा ते आपल्या वेगवेगळ्या रेसिपींचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतेच त्यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिलं की, ‘होळी हा कुटुंबासोबत साजरा करण्याचा सण आहे. महाराष्ट्रातील घरोघरी बनवली जाणारी ही खमंग पुरणपोळी कशी बनवायची? चला आज तुम्ही माझ्याकडून शिकून घ्या...’ या व्हिडीओमध्ये डॉ. श्रीराम नेने यांचे आई आणि वडील देखील दिसले आहेत.
डॉ. नेने हे स्वतःच्या हाताने पुरणपोळी बनवताना या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. श्रीराम नेने यांनी होळीच्या निमित्ताने खास पुरणपोळ्या बनवल्या आहेत. या व्हिडीओमध्ये पुरणपोळीची अगदी डाळ शिजवून त्याचं पुरण करण्यापासून ते पोळी व्यवस्थित तूप लावून शेकवण्यापर्यंतची रेसपी पाहायला मिळत आहेत. आता माधुरी दीक्षितच्या नवऱ्याला पुरणपोळ्या बनवताना बघून नेटकरी देखील सुखावले. जगभरातील चाहत्यांनी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. 'जमलं की डॉक्टरसाहेब तुम्हाला. लकी आहेत माधुरी मॅडम', असं नेटकरी म्हणत आहेत.
डॉ श्रीराम नेने यांचा जन्म लंडनमध्ये झाला. तर त्यांचं शिक्षण अमेरिकेत झालं. ते अमेरिकेत कार्डिव्हॅस्क्युलकर सर्जन होते. नेने यांचे आईवडीलही अमेरिकेतच राहत असत. त्यांच्या वडिलांचं नाव माधव नेने आहे. श्रीराम यांना एक बहीणही आहे, जिचं नाव सीमा नेने आहे. 17 ऑक्टोबर 1999 साली माधुरी डॉ नेनेंच्या घरची सून झाली. यानंतर ती देखील अमेरिकेतच स्थायिक झाली. काही वर्षांपूर्वीच दोघंही भारतात परतले आहेत. दोघांनी आता निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं असून त्यांचा एक सिनेमाही रिलीजही झाला आहे.