माधुरीच्या ओठांमुळे थांबवावं लागलं होतं शूटिंग, नेमकं काय झालं होतं? तुम्हाला माहितीये का हा किस्सा?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 02:09 PM2024-04-03T14:09:18+5:302024-04-03T14:09:57+5:30
Madhuri dixit: शूटिंग करतानाच माधुरीसोबत घडला होता किस्सा, सेटवर डॉक्टरांना बोलवलं अन्...; पुकार सिनेमाच्यावेळी काय घडलं होतं?
बॉलिवूडची धकधक गर्ल असं बिरुद मिरवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित (madhuri dixit). उत्तम अभिनय, सौंदर्य आणि नृत्यकौशल्य यांच्या जोरावर माधुरीने बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. इतकंच कशाला तर आजही ती इंडस्ट्रीमध्ये कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यामध्येच सध्या माधुरीचा एक किस्सा नेटकऱ्यांमध्ये चर्चेला जात आहे. एका लोकप्रिय गाण्याचं शूट करत असतांना माधुरीचे प्रचंड हाल झाले होते. कडाक्याच्या थंडीमुळे तिचे ओठ चक्क निळे पडले होते.
२००० साली रिलीज झालेला पुकार हा सिनेमा साऱ्यांच्याच लक्षात असेल. प्रभूदेवाने या सिनेमात माधुरीसोबत स्क्रीन शेअर केली होती. परंतु, या सिनेमातील एक गाणं शूट करतांना माधुरीला अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला होता.
या सिनेमातील 'किस्मत से हम तुमको मिले' हे गाणं माधुरी आणि अनिल कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं. हे गाणं अलास्काच्या ग्लेशिअर येथे शूट झालं होतं. या गाण्यात माधुरीने शिफॉन साडी नेसली होती. मात्र, कडाक्याच्या थंडीत हे गाणं शूट केल्यामुळे माधुरी आजारी पडली होती. तिचे ओठ चक्क निळे पडले होते. ज्यामुळे या सिनेमाचं शुटींगमध्येच थांबवावं लागलं होतं. एका मुलाखतीमध्ये माधुरीने हा किस्सा शेअर केला होता.
या गाण्याचं शूट बर्फाच्छदित डोंगरांमध्ये सुरु होतं. यात माधुरीने शिफॉनची साडी नेसल्यामुळे तिला थंडी जास्त जाणवत होती. परिणामी, थंडी सहन न झाल्यामुळे माधुरीचे ओठ चक्क निळे पडले. तिची प्रकृती खालवू लागली. त्यामुळे ऐनवेळी लोकेशनवर डॉक्टरांना बोलवावं लागलं. डॉक्टरांनी योग्य उपचार केल्यानंतर माधुरीला बराच काळ हिटरसमोर बसवून ठेवलं. त्यानंतर तिला थोडं बरं वाटायला लागलं आणि या गाण्याचं शूट पूर्ण करण्यात आलं.
दरम्यान, या सिनेमात तिच्याव्यतिरिक्त नम्रता शिरोडकरनेही स्क्रीन शेअर केली होती. माधुरी बॉलिवूडसह मराठी कलाविश्वातही सक्रीय आहे. तसंच ती अनेक डान्स रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडतांना दिसून येते.