महाभारतात इंद्राची भूमिका साकारणाऱ्या सतिश कौल यांचे निधन, उपचारासाठी देखील नव्हते पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 03:58 PM2021-04-10T15:58:20+5:302021-04-10T16:34:56+5:30
सतिश कौल यांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी दिलीप कुमार आणि नूतन यांच्या कर्मा या प्रसिद्ध चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.
पंजाबी चित्रपटांचा अमिताभ बच्चन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सतीश कौल यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी दिलीप कुमार आणि नूतन यांच्या कर्मा या प्रसिद्ध चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. सतिश यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ते लुधियानामध्ये राहात होते.
निर्माते अशोक पंडित यांनी ट्वीट करत सतिश कौल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीट केले आहे की, पंजाबी आणि बॉलिवूडमधील अभिनेते सतिश कौल यांच्या निधनामुळे खूपच वाईट वाटले. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते.
Sad to know about the demise of well known actor of Hindi & Punjabi films Satish Kaul in #Ludhiyana due to #COVID19 .
— Ashoke Pandit (@ashokepandit) April 10, 2021
He was unwell since a long time .
Heartfelt condolences to his family & near ones .
ॐ शान्ति ! pic.twitter.com/vnyP7X8Iyl
सतिश कौल यांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. ते दिलीप कुमार, धर्मेंद्र, देव आनंद यांसारख्या अनेक दिग्गजांसोबत चित्रपटांमध्ये झळकले होते. तसेच महाभारतात त्यांनी इंद्रदेवाची भूमिका साकारली होती. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती. त्यांना सांभाळायला देखील कोणीही तयार नव्हते. त्यांनी चित्रपटसृष्टीतील लोकांना आवाहन करून मदत देखील मागितली होती. कोरोना काळात तर त्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती.
सतिश कौल यांचा जन्म ८ सप्टेंबर १९५४ ला काश्मीरमध्ये झाला. त्यांचे वडील हे प्रसिद्ध शायर होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी पुण्यात पाठवले. तिथे त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये अभिनयाचे धडे गिरवले. जया बच्च, शत्रुघ्न सिन्हा, डॅनी डेंझोम्पा यांसारखे दिग्गज कलाकार त्यांच्या वर्गात होते. त्यांनी इथूनच त्यांच्या बॉलिवूड प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी जवळजवळ ३० वर्षं चित्रपटांमध्ये काम केले. १९७३ ला सतिश कौल यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर काहीच वर्षांत त्यांचे लग्न झाले. त्यांच्या पत्नीच्या कुटुंबातील सगळे अमेरिकेत राहात होते. त्यामुळे आपण देखील अमेरिकेला कायमचे जावे असे त्यांचे म्हणणे होते. पण काही केल्या सतिश आपले अभिनय करियर सोडायला तयार नव्हते आणि त्याचमुळे त्यांच्या पत्नीत आणि त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि ते एकटे राहायला लागले.
अनेक वर्षं चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर सतिश यांनी एका वाहिनीद्वारे लोकांना अभिनयाचे धडे द्यायला सुरुवात केली. सगळे काही सुरळीत सुरू असताना २०१४ मध्ये ते बाथरूममध्ये पडले आणि त्यांना दुखापत झाली. त्यांनी यावर मुंबईत उपचार घेतले. ते जवळजवळ दीड वर्षं अंथरुणाला खिळून होते. त्यानंतर काही महिने पटियाला येथील रुग्णायलात त्यांना दाखल करण्यात आले होते. या सगळ्यात त्यांनी कमावलेले सगळे पैसे संपले. त्यामुळे त्यांना ११ हजार रुपये पेशन्स देण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला. त्यांना मिळणाऱ्या पैशांतून त्यांनी अभिनय स्कूल सुरू केले. पण त्याला लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ते वृद्धाश्रमात राहायला लागले. त्यांची परिस्थिती कळल्यानंतर त्यांच्या एका फॅनने त्यांना घरी नेले होते. काही काळानंतर सरकारकडून मिळणारे त्यांचे पेन्शन देखील बंद झाले होते. सतिश यांनी अनेक वर्षं अभिनय क्षेत्रात काम केल्यामुळे या क्षेत्रातील कोणीतरी त्यांना मदत करावी असे त्यांनी आवाहन केले होते. पण या आवाहनाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता.