संजय दत्तने दर्शवला आदित्य ठाकरे यांना पाठिंबा, त्यांना निवडून देण्याचे केले लोकांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 03:20 PM2019-10-16T15:20:39+5:302019-10-16T15:31:58+5:30
अभिनेता संजय दत्तने नुकताच ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे.
देशात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सत्ताधाऱ्यांसह विरोधक देखील प्रचारामध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर देखील लोक आपल्या आवडत्या पक्षाचा, उमेदवाराचा प्रचार करत आहेत. बॉलिवूडमधील अनेक मंडळीदेखील सोशल मीडियाद्वारे आपल्या आवडत्या पक्षाला पाठिंबा देताना दिसत आहेत. अभिनेता संजय दत्तने नुकताच ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे.
Shivsena for one and all !!!
— Rahul.N.Kanal (@Iamrahulkanal) October 15, 2019
Shivsena for Maharashtra !!!
First choice and the best choice 🏹
Love and support for @AUThackeray Ji heartfelt words by @duttsanjay Dutt Sahab 🙏
together we can... New Maharashtra !!! pic.twitter.com/zl2nmp0fTZ
संजय दत्तने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात त्याने म्हटले आहे की, आदित्य हा मला माझ्या लहान भावाप्रमाणे आहे. त्याला बाळासाहेबांसारख्या मोठ्या नेत्याचा वारसा लाभला आहे. आपल्या देशाला आज तरुण आणि तडफदार अशा नेत्याची गरज असून आदित्यला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे.
संजयने या व्हिडिओद्वारे आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या असून ठाकरे कुटुंबियांचे कौतुक देखील केले आहे. तो या व्हिडिओत म्हणाताना दिसत आहे की, मला आणि माझ्या कुटुंबाला बाळासाहेबांनी मोठा पाठिंबा दिला होता. ते मला वडिलांसारखे होते.
संजय दत्तची बहीण प्रिया दत्त या काँग्रेसच्या नेत्या असून त्यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. त्यावेळी त्यांच्या प्रचारात आपल्याला संजय दत्तला पाहायला मिळाले होते. तसेच संजय अनेकवेळा काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करताना देखील दिसतो. पण संजयने आता शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूडचा नायक अनिल कपूरला नुकतेच बॉलिवूडसोबतच राजकारणाविषयी देखील विचारण्यात आले होते. अनिल कपूरने नायक या चित्रपटात एका मुख्यमंत्र्याची भूमिका साकारली होती. एका वाहिनीमध्ये काम करणाऱ्या पत्रकाराला म्हणजेच अनिलला एक दिवसाचा मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळते आणि केवळ एका दिवसांत तो राज्यात किती बदल घडवतो हे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळाले होते. याच चित्रपटाच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणातील खरा नायक कोण असे अनिल कपूरला विचारण्यात आले होते. अनिल कपूरने क्षणाचाही विलंब न लावता आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील खरे नायक असल्याचे कबूल केले होते.