मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गोविंदाला फोन, तब्येतीची विचारपूस करत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 02:13 PM2024-10-01T14:13:27+5:302024-10-01T14:14:26+5:30
एकनाथ शिंदे यांनी गोविंदाच्या तब्येतीची फोन करुन विचारपूस केली
अभिनेता गोविंदाच्या गुडघ्याला गोळी लागली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना सकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली आहे. डॉक्टरांनी गोळी काढली असून आता तो सुखरुप आहे, काळजी करण्याचं कारण नाही अशी माहिती समोर आली आहे. सध्या तो रुग्णालयातच उपचार घेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाला फोन करुन तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
गोविंदावर सध्या मुंबईतील क्रिटिकेअर एशिया रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोविंदाला गोळी लागल्याची ही बातमी समोर येताच चाहत्यांकडून काळजी व्यक्त करण्यात येतेय. अनेकांनी गोविंदाच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली तसेच त्याला बरे वाटावे यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. या संपुर्ण घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाशी फोनवरुन संवाद साधला.
एकनाथ शिंदे यांनी गोविंदाच्या तब्येतीची फोन करुन विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी गोविंदाला लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी आणि स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. या कठीण काळात राज्य सरकार आणि जनतेच्या शुभेच्छा आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत, असे कुटुंबियांना आश्वासनही दिलं. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून ट्विट करत ही माहिती देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी लोकप्रिय अभिनेते गोविंदा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी आणि स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी राज्य सरकार आणि जनतेच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 1, 2024
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, गोविंदा हा पहाटे एका कार्यक्रमासाठी कोलकत्याला जाणार होता. त्यासाठी तयार होत असताना त्याने आपलं परवाना असलेलं रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवण्यासाठी हातात घेतलं. मात्र रिव्हॉल्व्हर चुकून खाली पडलx आणि लॉक खुलं राहिल्याने पायाला गोळी लागली. गोळी लागल्यानंतर अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याच्या पायातील गोळी काढली असून, गोविंदाची प्रकृती आता स्थिर आहे. सध्या त्याचे कुटुंबीय रुग्णालयात आहेत.