‘तान्हाजी’वर प्रेक्षक फिदा पण गोडोलीचे गावकरी नाराज, जाणून घ्या काय आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 10:13 AM2020-01-24T10:13:46+5:302020-01-24T10:16:57+5:30
होय, महाराष्ट्रातल्या गोडोली गावातील गावकरी ‘तान्हाजी’च्या मेकर्सवर नाराज आहेत.
नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या दैदिप्यमान तेजस्वी पराक्रमाची गाथा सांगणारा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटावर सध्या प्रेक्षकांच्या उड्या पडताहेत. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा हा सिनेमा सगळीकडे हाऊसफुल सुरु आहे. एकंदर काय तर प्रेक्षक ‘तान्हाजी’वर फिदा आहेत. पण महाराष्ट्रातल्या गोडोली गावातील गावकरी मात्र ‘तान्हाजी’च्या मेकर्सवर नाराज आहेत. होय, सातारा जिल्ह्यातील गोडोली याच गावात नरवीर तान्हाजी मालुसरे यांचा जन्म झाला होता. गोडोलीच्या समस्त गावक-यांना याचा अभिमान आहे. मात्र ‘तान्हाजी’ या अजय देवगणच्या चित्रपटात गोडोलीचा साधा उल्लेखही नसल्याने गावकरी दुखावले आहेत.
सिनेमात तान्हाजींना कोकणातील उमरठ गावाचे असल्याचे दाखवण्यात आले आहे. गोडोलीच्या गावक-यांनी याबद्दलची स्पष्ट नाराजी बोलून दाखवली आहे. केवळ इतकेच नाही तर आता तान्हाजींच्या जन्मस्थळाचा हा मुद्दा चित्रपटाच्या निर्मात्यांपर्यंत रेटण्याचा मनोदय गावक-यांनी बोलून दाखवला आहे.
गोडोलीच्या एका गावक-याने सांगितल्यानुसार, काही वर्षांपूर्वी गावात मालुसरेंख्या घराचे अवशेष मिळाले होते. हे संपूर्ण अवशेष सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. गोडोलीच्या मातीत तान्हाजींचे स्मारक उभारून त्याठिकाणी यातील काही अवशेष वापरण्यात येणार आहे.
गावक-यांच्या मते, तान्हाजींचा जन्म गोडोली गावात झाला असल्याने चित्रपटात त्याचा उल्लेख असायला हवा होता. किमान त्यांनी या गावात घालवलेले बालपण सिनेमात दाखवायला हवे होते. चित्रपटाचा काही भागही गावात चित्रीत व्हायला हवा होता. या संपूर्ण पार्श्वभूमीवर तान्हाजीचा चुकीचा इतिहास जगाला दाखवला जात असल्याचा आरोपही गोडोलीकरांनी केला आहे.
गोडोलीच्या अन्य एका गावक-याने सांगितले की, वर्षभरापूर्वी आम्ही गावक-यांनी तान्हाजींच्या 13 व्या वंशज शीतल मालुसरे यांच्याकडे चित्रपटात गोडोली गाव दाखवले जावे, अशी विनंती केली होती. आता आम्ही पुढील कारवाईसाठी ग्रामसभेत हा मुद्दा उपस्थित करणार आहोत.
‘तान्हाजी’ हा सिनेमा ओम राऊतने दिग्दर्शित केला असून अजय देवगण व भूषण कुमार या दोघांची निर्मिती आहे.