Aashiqui 3मध्ये कार्तिक आर्यनबरोबर रोमान्स करणार तृप्ती डिमरी? महेश भट्ट यांचा मोठा खुलासा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 17:41 IST2023-12-27T17:38:54+5:302023-12-27T17:41:22+5:30
'आशिकी ३'मध्ये तृप्ती बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनबरोबर रोमान्स करणार असल्याचीही चर्चा रंगली होती. आता यावर आशिकीचे निर्माते महेश भट यांनी भाष्य केलं आहे.

Aashiqui 3मध्ये कार्तिक आर्यनबरोबर रोमान्स करणार तृप्ती डिमरी? महेश भट्ट यांचा मोठा खुलासा, म्हणाले...
'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन्स दिल्यामुळे तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली. 'ॲनिमल'च्या यशानंतर तृप्तीचं नशीबच उजळलं. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. अशातच तृप्तीची 'आशिकी ३'मध्ये वर्णी लागल्याचंही बोललं जात होतं. या सिनेमात तृप्ती बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनबरोबर रोमान्स करणार असल्याचीही चर्चा रंगली होती. आता यावर आशिकीचे निर्माते महेश भट यांनी भाष्य केलं आहे.
"या सगळ्यात कोणतंही तथ्य नाही. आम्ही स्क्रिप्ट आणि म्युझिक पूर्णपणे तयार झाल्याशिवाय कास्टिंगचा विचार करणार नाही. प्रत्येकाला आशिकीच्या फ्रेंचाइजीमधून प्रसिद्धी मिळवायची आहे. मी आतापर्यंत तृप्तीला भेटलोदेखील नाही आहे. आतापर्यंत फक्त कार्तिक आर्यनचं नाव फायनल झालं आहे. कार्तिक आणि म्युझिकच 'आशिकी ३'चे स्टार आहेत. म्युझिक नंतरच या सिनेमाच्या बाकीच्या गोष्टींबाबत विचार केला जाईल," असं महेश भट्ट म्हणाले. त्यामुळे 'आशिकी ३'मध्ये तृप्ती कार्तिकबरोबर रोमान्स करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
१९९०मध्ये 'आशिकी' फ्रेंचाइजीचा पहिला सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमात राहुल रॉय आणि अनु अग्रवाल मुख्य भूमिकेत होते. त्यांची मोठ्या पडद्यावरील जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या सिनेमातील गाणीही प्रचंड हिट झाली होती. महेश भट यांनी 'आशिकी'चं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर २०१३ मध्ये या सिनेमाचा सिक्वल 'आशिकी २' प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत होते. आता 'आशिकी ३'साठी प्रेक्षक उत्सुक आहेत.