सतत शाहरुखचं नाव घेऊन ट्रोल झाली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान; म्हणाली, "तुम्ही विचारुच नका..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 05:32 PM2024-12-10T17:32:59+5:302024-12-10T17:33:56+5:30
कराची इथे पत्रकार परिषदेत माहिरा खानने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं.
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने (Mahira Khan) २०१७ साली शाहरुख खानच्या 'रईस' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. माहिरा शाहरुखची मोठी चाहती आहे. त्यामुळे अनेकदा मुलाखतींमध्ये ती शाहरुखविषयी बोलताना दिसते. मात्र ती लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी किंग खानचं नाव घेते अशी तिच्यावर टीका होत आहे. यावर आता तिनेही सडेतोड उत्तर दिलं आहे.
कराची इथे पत्रकार परिषदेत माहिरा खानने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं. ती म्हणाली, "जेव्हाही कोणती मुलाखत असते तेव्हा मला शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव विचारला जातो. माझं तर शाहरुखविषयी बोलून कधीच मन भरत नाही. त्यामुळे मी भरभरुन उत्तर देते. पण मग लोकांना वाटतं की मीच स्वत:हून त्याच्याविषयी बोलते. पण तसं नसतं कोणी विचारलं तर मी बोलते. मग असं जर असेल तर तुम्हीच मला शाहरुखविषयी प्रश्न विचारु नका."
'शाहरुख खान म्हणजे माझं लहानपणीचं प्रेम आहे' असंही ती यावेळी म्हणाली. माहिरा खान आणि शाहरुखची 'रईस' सिनेमातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यांचं 'जालिमा' हे गाणंही खूप गाजलं होतं.
माहिरा खान तिच्या 'हमसफर' या पाकिस्तानी मालिकेमुळे भारतातही लोकप्रिय झाली. तिची ही मालिका भारतातही खूप गाजली होती. फवाद खानसोबत तिने या मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर 'बिन तेरे' या मालिकेतही ती झळकली. माहिराच्या सौंदर्यावर अख्खं जग फिदा आहे. पुढील वर्षी माहिराचा 'नीलोफर' सिनेमा येत आहे.