मलायका अरोरा सांगतेय, त्या एका रात्रीने बदलले माझे आयुष्य, कधीच विसरू शकत नाही ती रात्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 07:30 PM2020-04-05T19:30:00+5:302020-04-05T19:30:02+5:30
अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका तिच्या खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे.
मलायका अरोरा आणि अरबाज खान हे बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक मानले जात होते. ते दोघे कधी घटस्फोट घेतील असे त्यांच्या चाहत्यांना देखील वाटले नव्हते. पण त्यांनी 2016 मध्ये घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटानंतर आता ते दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. मयालका लवकरच अभिनेता अर्जुन कपूरसोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे तर अरबाज जॉर्जिया या मॉडेलसोबत नात्यात आहे. काही दिवसांपूर्वी रेडिओ एफएम वाहिनीवरील करिना कपूरच्या चॅनल इश्क या कार्यक्रमात करिनाने मलायकाची मुलाखत घेतली होती. त्यावेळी तिने तिच्या आणि अरबाजच्या घटस्फोटाविषयी अनेक गोष्टी करिनाला सांगितल्या. घटस्फोटाच्या आदल्या दिवशी घरात कसे वातावरण होते यावर देखील मलायका भरभरून बोलली होती.
त्यावर मलायकाने सांगितले होते की, मी माझ्या या निर्णयाबद्दल माझ्या कुटुंबियांना आणि माझ्या मित्रमैत्रिणींना सगळ्यात पहिल्यांदा सांगितले होते. पण सगळ्यांनी मला यावर पुन्हा एकदा विचार करायचा सल्ला दिला होता. तू असे काहीही करू नकोस असे सगळ्यांचे मत होते. पण यावर माझे म्हणणे होते की, कोणत्याही घरात घटस्फोटाचा विषय काढल्यानंतर तू घटस्फोट घे असे कोणीही तुला म्हणणार नाही. मी अतिशय विचार करूनच हा निर्णय घेतला असल्याचे त्यांना समजावून सांगितले. घटस्फोटाच्या आदल्या दिवशी पर्यंत अरबाजचे कुटुंब त्याला या सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा विचार करायला सांगत होते. इथे माझ्या घरी देखील काही वेगळी परिस्थिती नव्हती. मी माझ्या निर्णयावर खंबीर आहे का हे माझ्या घरातील मंडळी मला वारंवार विचारत होते. त्यांच्या बोलण्यातून त्यांना माझी चिंता लागली असल्याचे मला कळत होते. घटस्फोटाच्या आदल्या दिवशी सगळेच टेन्शनमध्ये होते.
अरबाजसोबत घटस्फोटाबाबत मलायकाने कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला सांगितल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. याविषयी ती सांगते, मी आणि अरबाज घटस्फोट घेतोय हे मी माझ्या घरातील लोकांना आणि मित्रमैत्रिणींना सांगितल्यावर त्यांना सुरुवातीला आश्चर्याचा धक्का बसला होता. ते काही क्षणासाठी जागच्या जागी स्तब्ध उभे होते. पण कालांतराने त्यांनी मला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, तू हा निर्णय घेतेस म्हणजे तू कणखर स्त्री आहेस. त्यांच्या या बोलण्यामुळे मला आधार मिळाला. त्या परिस्थितीत मला त्या आधाराची प्रचंड गरज होती.