बॅडमिंटन खेळताना अचानक कोसळला...! अभिनेता सबरीनाथचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 11:09 AM2020-09-18T11:09:11+5:302020-09-18T11:10:28+5:30
मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीतून दु:खद बातमी...
मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर आली आणि चाहत्यांना धक्का बसला. मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता सबरी नाथ याचे गुरुवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. तो 43 वर्षांचा होता. त्रिवेंद्रमच्या एका खासगी रूग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या मागे त्याची पत्नी आणि दोन मुली असे कुटुंब आहे.
सबरी नाथच्या अकाली निधनाने मल्याळम मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. एक हरहुन्नरी अभिनेता हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
बॅडमिंंटन खेळताना अचानक कोसळला
सबरी नाथ बॅडमिंटन खेळत होता़ बॅडमिंटन खेळत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा धक्का आला. तो कोसळला. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने मित्रांनी तातडीने त्याला रूग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचताच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
सबरीनाथने मिन्नूकेतु, अमाला, स्वामी अयप्पन यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते.
सबरी नाथने आपल्या करियरची सुरुवात मल्याळम सीरियल मिन्नूकेतुपासून केली. यात त्याने आदित्यची भूमिका निभावली होती.
सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली
सबरी नाथच्या अकाली निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित सबरीला श्रद्धांजली वाहिली.
नियुम नजानुम या मालिकेचा अभिनेता शिजु ए. आरने इन्स्टाग्रामवर सबरीचा फोटो शेअर करत लिहिले, ‘मनापासून श्रद्धांजली, अद्यापही विश्वास बसत नाहीये.’
सबरीनाथसोबत टीव्ही सीरिअलमध्ये काम करणारी अभिनेत्री अर्चना सुसीलेन हिने लिहिले, ‘विश्वास बसत नाहीये. परमेश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो.’
दोन दिवसांपूर्वीच प्रशांत लोखंडेचेही झाले होते निधन
दोन दिवसांपूर्वी युवा अभिनेता प्रशांत लोखंडे याचं हृदयविकाराच्या धक्काने निधन झाले होते. स्वराज्यरक्षक संभाजी, स्वराज्यरजननी जिजामाता यासारख्या भूमिकांमध्ये त्याने़ भूमिका साकारली होती. स्वराज्यरक्षक संभाजीमध्ये प्रशांतने अब्दुला दळवी ही भूमिका साकारली होती.
'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेत 'अब्दुल्ला दळवी' साकारणाऱ्या कलाकाराचे निधन