"महामंडलेश्वर बनणं हे ऑलिम्पिक मेडल जिंकल्यासारखंच...", ममता कुलकर्णीने व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 10:24 IST2025-01-26T10:22:35+5:302025-01-26T10:24:12+5:30

किन्नर आखाड्याचीच महामंडलेश्वर का बनली ममता? ममताच्या या निर्णयाची देशभरात चर्चा सुरु आहे.

mamta kulkarni says becoming mahamandaleshwar is similar to win olympic medal | "महामंडलेश्वर बनणं हे ऑलिम्पिक मेडल जिंकल्यासारखंच...", ममता कुलकर्णीने व्यक्त केल्या भावना

"महामंडलेश्वर बनणं हे ऑलिम्पिक मेडल जिंकल्यासारखंच...", ममता कुलकर्णीने व्यक्त केल्या भावना

'करण अर्जुन' सारख्या सुपरहिट सिनेमात दिसलेली बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली आहे. महाकुंभ २०२५ मध्ये ती पवित्र स्नान करण्यासाठी पोहोचली होती. यानंतर तिने किन्नर आखाड्याचा भाग होणार असल्याचं जाहीर केलं. महाकुंभाच्या संगमावर पिंडदान केलं. तिचा पट्टाभिषेक कार्यक्रमही झाला. ममताच्या या निर्णयाची देशभरात चर्चा सुरु आहे. दरम्यान ममताने हे ऑलिम्पिक मेडल जिंकल्यासारखं आहे असं विधान केलं.

साध्वी बनल्यानंतर ममता कुलकर्णीने माध्यमांना मुलाखत दिली. ती म्हणाली, "१४४ वर्षांनंतर हा क्षण आला आहे. यातच मला महामंडलेश्वर बनण्याची संधी मिळाली. हे केवळ आदिशक्तीच करु शकते. मी किन्नर आखाड्याचीच निवड केली कारण यात सगळं स्वातंत्र्य आहे. कोणतेही निर्बंध नाहीत."

पुन्हा अभिनय करणार का यावर ममता म्हणाली, "आयुष्यात तुम्हाला सगळंच पाहिजे. मनोरंजनही हवंच. ध्यान ही अशी गोष्ट आहे नशिबानेच मिळते. गौतम बुद्धांनीही बरंच काही पाहिलं आणि नंतर त्यांच्यात परिवर्तन झालं. पण आता अभिनय करण्याची मी कल्पनाही करु शकत नाही. ते शक्य नाही. किन्नर आखाड्याचे लोक महादेव आणि माता पार्वती यांच्या अर्धनारेश्वर अवताराचं प्रतिनिधित्व करतात. अशा आखाड्याची महामंडलेश्वर बनणं हे माझ्यासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकण्यासारखंच आहे. माझ्या २३ वर्षांच्या साधनेनंतर मला ही संधी मिळाली."


महामंडलेश्वर बनण्याची प्रक्रिया नेमकी काय होती यावर ती म्हणाली, "४ जगतगुरुंनी माझी परीक्षा घेतली. कठीण प्रश्न विचारले. मी किती साधना केली आहे हे त्यांना माझ्या उत्तरातून समजलं. २ दिवसांपासून ते मला महामंडलेश्वर बनण्यासाठी आग्रह करत होते. तेव्हा मी म्हटलं की तसा वेष धारण करण्याची काय गरज आहे. " ममता कुलकर्णीचं नाव बदलून आता श्री यमाई ममता नंदगिरी असं ठेवण्यात आलं आहे. 

Web Title: mamta kulkarni says becoming mahamandaleshwar is similar to win olympic medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.