Pushpa 2 : थिएटरमध्ये 'पुष्पा 2' लावला नाही, व्यक्तीने केली तोडफोड; मालकाला जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 11:09 IST2024-12-06T11:09:05+5:302024-12-06T11:09:59+5:30
Pushpa 2 : 'पुष्पा 2'च्या स्क्रीनिंगबाबत एक धक्कादायक घटना समोर येत आहे.

Pushpa 2 : थिएटरमध्ये 'पुष्पा 2' लावला नाही, व्यक्तीने केली तोडफोड; मालकाला जीवे मारण्याची धमकी
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट गुरुवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवसापासूनच लोकांना त्याचं वेड लागलं आहे. गुरुवारी देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी जमली होती. एकीकडे अल्लू अर्जुनचा चित्रपट काही मोठे रेकॉर्ड बनवत आहे. तर दुसरीकडे काही गोष्टी त्रासदायक ठरत आहेत.
आता तेलंगणातून 'पुष्पा 2'च्या स्क्रीनिंगबाबत एक धक्कादायक घटना समोर येत आहे. तेलंगणातील एका थिएटरमध्ये अल्लू अर्जुनचा चित्रपट लावला नाही तेव्हा एका व्यक्तीने थिएटरमध्ये घुसून तोडफोड केली. प्रकरण इथेच थांबलं नाही तर या व्यक्तीने थिएटर मालकाला जीवे मारण्याची धमकीही दिली. पोलिसांनी या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
ANI एका वृत्तानुसार, ही घटना तेलंगणातील मंचेरियल जिल्ह्यातील चेन्नूर शहरात घडली. चेन्नूरच्या श्रीनिवास थिएटरमध्ये अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट न लावल्याने एका व्यक्तीचा स्वत:वरील ताबा सुटला. थिएटर मॅनेजमेंटला विरोध करत त्याने मित्रांसह जबरदस्तीने थिएटरमध्ये घुसून थिएटरच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या.
या व्यक्तीचा राग इथेच थांबला नाही आणि त्याने अल्लू अर्जुनचा चित्रपट न लावल्यास श्रीनिवास थिएटरचे मालक राजमल गौर यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आला असून त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेलंगणातील या घटनेपूर्वी हैदराबादमध्ये 'पुष्पा 2'च्या स्क्रिनिंगवेळी एक दुःखद घटना घडली होती. बुधवारी अल्लू अर्जुन स्वतः हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चाहत्यांसह चित्रपटाचा विशेष प्रीमियर शो पाहण्यासाठी पोहोचला.
'पुष्पा 2' स्टारची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली, ज्यामुळे गोंधळ उडाला. थिएटरचे मुख्य गेट तुटल्याने चेंगराचेंगरी झाली आणि या घटनेत एका ३५ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला. महिलेच्या ९ वर्षाच्या मुलालाही गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यात अल्लू अर्जुनचंही नाव आहे.