या अभिनेत्रीसोबत मनोज वाजपेयीने थाटला संसार, लग्नानंतर बॉलिवूडमधून झाली गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 10:16 AM2020-04-23T10:16:15+5:302020-04-23T10:17:17+5:30
या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अभिनेता मनोज वाजपेयी याचा आज वाढदिवस. २३ एप्रिल १९६९ रोजी जन्मलेला मनोज एका शेतकऱ्याचा मुलगा असून त्याने डॉक्टर बनून समाजाची सेवा करावी, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. पण मनोजला डॉक्टर नाही तर अभिनेता बनायचे होते. मनोजचे नाव अभिनेता मनोज कुमार यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. आज मनोज वाजपेयी बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळखला जातो, पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता.
१९९८ मध्ये प्रदर्शित राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ने मनोज वाजपेयी या नावाला नवी ओळख दिली. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण त्याआधी एक काळ असाही होता, जेव्हा लोक त्याच्याकडे ढुंकूनही बघत नव्हते. एका मुलाखतीत खुद्द मनोजने ही खंत बोलून दाखवली होती. त्याने सांगितले होते की, ‘तो एक काळ होता, जेव्हा मीडिया मला जराही भाव द्यायचा नाही. मी कुठल्याही पार्टीला गेलो आणि मीडियाचे कॅमेरे चुकून माझ्याकडे वळले तरी लगेच ते दुसऱ्या बाजूला वळवले जायचे.’
मनोज वाजपेयीचे लग्न अभिनेत्री नेहासोबत झाले असून तिने होगी प्यार की जीत, फिजा, राहुल, आत्मा अशा चित्रपटात काम केले आहे. एप्रिल २००६ मध्ये मनोज आणि नेहाने लग्न केले. यानंतर तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला आणि ती संसारात रमली. लग्नापूर्वी सुमारे सात वर्षे नेहा आणि मनोज रिलेशनशिपमध्ये होते. नेहा आणि मनोजला एक मुलगी असून तिचं नाव नैला आहे. बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतर नेहा अनेकवेळा मनोजच्या सिनेमांच्या स्पेशल स्क्रिनिंगला त्याच्यासोबत दिसते.
नेहाचे खरे नाव शबाना रजा आहे. तिने तिचे नाव का बदलले, यामागेही कारण आहे. होय, नेहा चित्रपटसृष्टीत आली, तेव्हा तिला तिचे नाव बदलण्याची मुळीच इच्छा नव्हती. एका मुलाखतीत तिने याचा खुलासा केला होता. माझ्या आईवडिलांनी मोठ्या प्रेमाने माझे शबाना नाव ठेवले होते. पण चित्रपटात आल्यानंतर नाव बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला आणि मला माझे नाव बदलावे लागले,असे तिने सांगितले होते.