मनोज कुमार यांनी शाहरुखवर दाखल केला होता १०० कोटींचा मानहानीचा खटला, काय होतं प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:58 IST2025-04-04T12:57:09+5:302025-04-04T12:58:11+5:30
शाहरुख खानने केलेला मनोज कुमार यांचा विश्वासघात?

मनोज कुमार यांनी शाहरुखवर दाखल केला होता १०० कोटींचा मानहानीचा खटला, काय होतं प्रकरण?
अभिनेते मनोज कुमार (Manoj Kumar) यांनी आज वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी भारतीय सिनेमाच्या इतिहासात अमूल्य योगदान दिलं. तीन दशके त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. देशभक्तीपर सिनेमांमुळे त्यांना भारत कुमार ही ओळखही मिळाली होती. सुमारे वीस वर्षांपूर्वीच ते अभिनय क्षेत्रापासून लांब गेले. मात्र मधल्या काळात शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) झालेल्या वादामुळे ते चर्चेत आले होते. शाहरुखवर त्यांनी १०० कोटींची मानहानीची केसही दाखल केली होती.
नक्की काय घडलं?
९ नोव्हेंबर २००७ सालची ही गोष्ट आहे. शाहरुख खानचा 'ओम शांती ओम' रिलीज जाला होता. या सिनेमातील एका गाण्यात शाहरुखने अख्खं बॉलिवूड आणलं होतं. धर्मेंद्र, जितेंद्र यांच्यापासून ते सलमान, संजय दत्त, प्रियंका चोप्रा, प्रिती झिंटा सारखे अनेक कलाकारांनी कॅमिओ केला होता. सिनेमात अनेक आयकॉनिक डान्स स्टेप्सही रिक्रिएट केल्या गेल्या. मात्र सिनेमातील एका सीनवरुन मनोज कुमार प्रचंड नाराज झाले होते. सिनेमात एका सीनमध्ये शाहरुख मनोज कुमार यांची नक्कल करतो. सीनमध्ये शाहरुखला एका प्रीमियरला जायचं असतं आणि तो सिनेमात मनोज कुमार यांची भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्याकडून पास चोरतो. यानंतर पोलिस त्यांना पकडतात आणि मारतात. मनोज कुमार यांनी जेव्हा हा सीन पाहिला ते खूप संतापले. त्यांना हे अपमानास्पद वाटले. त्यांनी शाहरुख आणि सिनेमाच्या निर्मात्यावर १०० कोटींची मानहानीची केस दाखल केली.
यानंतर सिनेमातला तो सीन डिलीट करण्यात आला. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुखने अभिनेत्याची माफीही मागितली. तो म्हणाला, "मी चुकलो. त्यांना जर वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो. मी त्यांना फोन केला होता. मला काळजी घ्यायला हवी होती . मी तुम्हाला आधीच फोन करायला हवा होता." यानंतर दिग्दर्शिका फरान खाननेही माफी मागितली होती.
यानंतर मनोज कुमार यांनी केस मागे घेतली होती. मात्र नंतरही जपानमध्ये सिनेमा एडिट न करताच रिलीज केला गेला. यानंतर मनोज कुमार पुन्हा भडकले होते. एका मुलाखतीत ते म्हणालेले की, "माझा विश्वासघात झाला आहे. मला याचं वाईट वाटलं आहे. त्याने माझी खिल्ली उडवणारे सीन डिलिट केले की नाही हे मला पाहायचं होतं. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. आता मी त्याला कधीच माफ करणार नाही."