मनोज कुमार यांनी मागे सोडली कोट्यवधींची मालमत्ता, संपत्ती जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:23 IST2025-04-04T12:22:27+5:302025-04-04T12:23:07+5:30
मनोज कुमार हे मृत्यूनंतर ते किती संपत्ती मागे सोडून गेलेत याबाबत जाणून घ्या...

मनोज कुमार यांनी मागे सोडली कोट्यवधींची मालमत्ता, संपत्ती जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल
Manoj Kumar Net Worth: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांनी आज (४ एप्रिल २०२५) वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांचं निधन झालं. प्रदीर्घ काळापासून मनोज कुमार आजारी होते. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीसह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. मनोज यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह यांसारख्या अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या मनोज कुमार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत योगदान दिलं आहे. दादासाहेब फाळके आणि पद्मश्री सारख्या पुरस्कारांनी सन्मानित झालेले मनोज हे मृत्यूनंतर ते किती संपत्ती मागे सोडून गेलेत याबाबत जाणून घेऊया.
मनोज कुमार यांचा जन्म एबटाबादमध्ये झाला होता, जो फाळणीनंतर पाकिस्तानचा हिस्सा बनला. फाळणीचं दु:ख मनोज यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं आहे. फाळणीनंतर मनोज कुमार १० वर्षांचे असताना त्यांचं कुटुंब दिल्लीला स्थलांतरीत झालं. मनोज कुमार यांंचं खरं नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी. अभिनयाच्या वेडापायी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईत आले. ते दिलीप कुमार यांचे चाहते होते. इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यानंतर स्वत:च नाव बदलून मनोज कुमार असं ठेवलं. तर देशभक्तीपर चित्रपटांमुळेच त्यांना बॉलिवूडमध्ये 'भारत कुमार' म्हणून ओळख मिळाली.
'सेलिब्रिटी नेट वर्थ'साइटनुसार, मनोज कुमार यांची एकूण संपत्ती २० दशलक्ष डॉलर्स (सुमारे १७० कोटी रुपये) आहे. गोस्वामी टॉवर नावाची एक मोठी इमारत मनोज कुमार यांच्या नावावर आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि रिअल इस्टेट गुंतवणुकीतून मनोज यांनी मोठी संपत्ती कमावली होती. मनोज यांना कुणाल गोस्वामी आणि शाल गोस्वामी हे दोन मुलं आहेत.