पत्रकाराच्या भूमिकेत मनोज वाजपेयी, करणार मुंबईतील स्कॅमचा पर्दाफाश, पाहा 'डिस्पॅच'चा ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 06:59 PM2024-12-03T18:59:06+5:302024-12-03T18:59:34+5:30
Despatch Trailer : मनोज वाजपेयी पुन्हा एकदा ओटीटीवर खळबळ माजवण्यासाठी येत आहे. अभिनेत्याचा 'डिस्पॅच' हा थ्रिलर चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे.
अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) हा बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेता आहे. केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर तो आता ओटीटीवरही अधिराज्य गाजवत आहे. मनोजने आतापर्यंतच्या कारकीर्दीत अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. आता हा अभिनेता 'डिस्पॅच' ( Despatch Movie)मध्ये पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे आणि ८००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा थरार उघड करणार आहे. त्याचा अप्रतिम ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे, जो पाहिल्यानंतर चाहते या चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट १३ डिसेंबर रोजी झी ५वर पाहायला मिळेल.
या सिनेमाचा खिळवून ठेवणारा ट्रेलर समाजातील गुन्हेगारी उघडकीस आणण्याच्या पत्रकाराच्या धाडसी प्रवासाची झलक दाखवतो. गुन्हेगारी पत्रकार जॉय बॅग एका भयंकर घोटाळ्यामागचं सत्य उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा जीव नकळतपणे धोक्यात येतो. हा तपास सोडून देण्यासाठी अज्ञात शत्रुकडून येणाऱ्या धमक्यांमुळे जॉय यांची ब्रेकिंग स्टोरी आणखीनच धोकादायक बनते. मात्र, तपास पुढे जातो तसं जॉय त्याच्या अपेक्षेपलीकडे भयानक वादळात अडकतो. डिस्पॅचमध्ये जॉय भ्रष्टाचारी मीडिया, सत्ता संघर्ष आणि वैयक्तिक अडचणींतून वाट काढत कशाप्रकारे तीव्र लढा देतो हे पाहायला मिळणार आहे. एकूणच डिस्पॅचचा ट्रेलर खूपच प्रभावी आहे. या चित्रपटात पार्वती सहगल आणि रितुपर्णा सेन यांच्याही भूमिका आहेत.
मनोज वाजपेयी म्हणाला, ‘मामी, इफ्फी आणि जेएफएफसारख्या विविध महोत्सवांनंतर डिस्पॅच हा सिनेमा ZEE5 वर सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून मी ZEE5 शी संबंधित आहे आणि डायल १००, सायलेन्स व सिर्फ एक बंदा काफी है या सिनेमांच्या यशानंतर आणखी एक गुंतवून ठेवणारा सिनेमा सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री वाटते. या भूमिकेसाठी सखोल तयारी करण्यावर माझा भर होता आणि कनूने एखाद्या कडक शिक्षकाप्रमाणे आमच्याकडून चौकटीबाहेरचे आणि सर्वोत्तम काम करून घेतले आहे. आम्हाला आशा आहे, की हा सिनेमा प्रेक्षकांची मने जिंकेल आणि आम्हाला आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा देईल.’