"हिरो काय साईड हिरोचेही रोल..." मनोज वाजपेयींना लुक्सवरुन केलं जायचं ट्रोल; सांगितला 'तो' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 10:45 AM2023-05-30T10:45:32+5:302023-05-30T10:46:53+5:30
नुकतंच मनोज वाजपेयींनी त्यांच्या संघर्षाचा काळ आठवला.
अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) हे स्वत:च अभिनयाचं विद्यापिठ आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हिंदी सिनेमातील अतिशय प्रभावशाली अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. एकापेक्षा एक फिल्म्स, ड्रामा यासाठी मनोज वाजपेयी ओळखले जातात. सध्या त्यांचा 'सिर्फ एक बंदा काफी है' सिनेमा गाजतोय. मनोज वाजपेयींनी सिनेमाचं जोरदार प्रमोशनही केलंय. पण एक काळ असा होता जेव्हा ते त्यांच्या लुक्समुळे रिजेक्ट झाले होते.
नुकतंच मनोज वाजपेयींनी त्यांच्या संघर्षाचा काळ आठवला. ते म्हणाले, " हा प्रवास सोप्पा नव्हता. सततचा स्ट्रगल आणि रिजेक्शनमुळे मी थकलो होतो आणि गावाकडे परत जाण्याच्या विचारात होतो. दिल्लीत मी १० वर्ष थिएटर केले तेव्हा माझ्याकडेही खायलाही पैसे नव्हते. पण याचा कधी त्रास झाला नाही कारण मला परफॉर्म करण्याची भूक होती. एक दिवस ऑडिशनसाठी खूप मोठी रांग होती तेव्हा असिस्टंटने आम्हाला वाईट वागणूक दिली होती. मी थिएटर केलं होतं, बँडिट क्वीनचा भाग होतो तरी मला अशी वागणूक मिळाली. तेव्हा मला वाटलं की मी चांगला अभिनेता आहे हा माझा भ्रम आहे. मला काम मिळत नव्हतं म्हणून मी परत गावी जाण्याच्या विचारात होतो."
ते पुढे म्हणाले, "अनेक लोक माझा तोंडावरच अपमान करायचे. तू ना हिरो दिसतो ना व्हिलन असं म्हणायचे. म्हणूनच मला हिरोच्या मित्राचेही रोल मिळत नव्हते तर व्हिलनच्या साईडचे रोल मिळायचे."
मनोज वाजपेयींचं हे स्ट्रगल न्यूकमर्सला प्रेरणा देणारे आहे. फिल्मइंडस्ट्रीचं कोणतंही बॅकग्राऊंड नसताना मनोज वाजपेयींनी हे यश प्राप्त केलं जे कौतुकास्पद आहे.