EXCLUSIVE: "कंगनाने अटलजींच्या भूमिकेची ऑफर दिली अन्...", श्रेयस तळपदेने सांगितला 'इमर्जन्सी'चा अनुभव
By ऋचा वझे | Updated: January 15, 2025 13:30 IST2025-01-15T13:30:04+5:302025-01-15T13:30:49+5:30
सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र न दिल्याने रिलीज डेट अनेकदा पुढे ढकलावी लागली. तसंच एकंदरच सिनेमात काम करण्याच्या अनुभवावर श्रेयसने 'लोकमत फिल्मी'सोबत सविस्तर संवाद साधला आहे.

EXCLUSIVE: "कंगनाने अटलजींच्या भूमिकेची ऑफर दिली अन्...", श्रेयस तळपदेने सांगितला 'इमर्जन्सी'चा अनुभव
>>ऋचा वझे
'इमर्जन्सी' (Emergency) हा कंगना राणौतचा (Kangana Ranaut) सिनेमा १७ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. कंगनाने सिनेमात माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. तर अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत मराठमोळा श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) झळकत आहे. सिनेमाच्या ट्रेलरचं सर्वत्र कौतुक होत असून श्रेयसला अटलजींच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. यानिमित्त श्रेयसने 'लोकमत फिल्मी'शी दिलखुलास संवाद साधला.
'इमर्जन्सी' सिनेमात अटलजींची भूमिका साकारणं हे आव्हानात्मक होतं का?
हो, आव्हानात्मक होतंच. अटलजी हे दिग्गज व्यक्तिमत्व होतं. त्यांची भूमिका साकारायला मिळणं हे खरं तर माझं भाग्यच आहे. ९० च्या दशकात आम्हीही तरुणपणात त्यांचं काम पाहिलं आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारायला मिळणं ही माझ्यासाठी मोठी संधी होती. यासाठी मी स्वत:ला नशिबवानच समजतो.
अनेकदा अशी भूमिका करायची असताना त्या व्यक्तीची मिमिक्री केल्यासारखं होतं. तसं होऊ नये यासाठी कशी काळजी घेतलीस?
मिमिक्री नक्कीच करायची नव्हती पण ते व्यक्तिमत्त्व उभं करायचं होतं. अटलजींच्या बोलण्याची स्टाईल वेगळी होती. त्यांच्या बोलण्यात pause असायचा. ते कविताही करायचे. तसंच सिनेमात सत्तरीचा काळ आहे आणि अटलजी तेव्हा तरुण, डायनॅमिक होते. स्वतःला सिद्ध करू पाहणारे असे होते. त्यांचं व्यक्तिमत्व तेव्हा कसं होतं त्या अनुषंगाने भूमिका करण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांच्या मनात जे अटलजी आहेत त्याच्या जवळपास असावं असा प्रयत्न केला पण उगाच कॅरिकेचर केलं नाही. दिग्दर्शकाला नेमकं कसं हवंय हे डोक्यात ठेवूनच काम केलं.
सिनेमाची ऑफर आल्यावर लगेच होकार दिलास का? प्रोपगंडा सिनेमा तर नाही ना असा विचार मनात आला का?
मला ऑफर मिळाली तेव्हा मी आश्चर्यचकीतच झालो. कंगनाला माझ्यात अटलजी दिसले हेच चकीत करणारं होतं. मी अर्थात हा विचार केला की कलाकार म्हणून हे मोठं आव्हान आहे आणि संधीही आहे. म्हणून मी ही भूमिका स्वीकारली. घाबरून पळून जाणं हे कलाकाराचं काम नाही. अशा भूमिका कमी येतात त्यामुळे जेव्हा येतात तेव्हा ती संधी सोडू नये.
कंगना विशिष्ट विचारधारेची आहे. त्यामुळे मनात विचार आला होता की प्रोपगंडा सिनेमा आहे का. तसं मी तिला आधीच विचारलं होतं. त्यावर ती म्हणाली की, 'तुम्ही आधी स्क्रीप्ट वाचा आणि त्यानंतर तुम्हाला असं काही वाटलंच तर नकार देऊच शकता.' पण स्क्रीप्ट वाचल्यावर मला खूप आवडली. जे घडलं होत तेच सादर केलं आहे. कोणत्या राजकीय पक्षाला फेव्हर केलं असं काही नाहीए. म्हणून मी भूमिका स्वीकारली.
इंदिराजींची भूमिका साकारणारी कंगना स्वत: सिनेमाची दिग्दर्शक, निर्मातीही आहे. तिच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता?
खूपच छान. तिने स्वत:च्या हिमतीवर सगळं यश मिळवलंय. दिग्दर्शकाच्या रुपातही तिला पाहून मी प्रभावित झालो. तिची स्पष्टता, जिद्द, गोष्टीचा संपूर्ण अभ्यास, दिग्दर्शन खूपच ताकदीचं होतं. कारण हा विषय सादर करणं आणि ती भूमिका निभावणं कठीण आहे. सर्व तथ्य तपासून, कुठे काही अती होता काम नये, कोणी दुखावलं जाऊ नये याची काळजी घेत निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय सगळंच करायचं. एक न्यूट्रल सिनेमा बनवायची जबाबदारी तिने खुबीने पेलली. त्याबद्दल तिचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.
कंगना खऱ्या आयुष्यात कशी आहे?
माझी तिच्याशी आधी ओळख नव्हती. आम्ही पहिल्यांदाच भेटलो. खूपच स्पष्ट, बेधडक बोलणारी मुलगी आहे. तिच्या मनात आहे ते ती बेधडक बोलते. तिचं बोलणं कधी लोकांना पटतं तर कधी खटकतं. पण ती जे करते ते स्वतःच्या हिमतीवर करते. सेटवर तिला घाबरुन राहावं असं कधीच झालं नाही. सेटवर सगळेच एकमेकांशी आदराने वागायचे. त्या मुलीमध्ये 'जिगरा' आहे. सगळ्यांमध्येच असा नसतो यासाठी guts लागतात. मी चॅलेंज देतो जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा दुसऱ्या मिनिटाला विसरून जाल की पडद्यावर कंगना आहे. तुम्ही इंदिराजींनाच बघाल. इंदिरा जी स्वतः आहेत असंच वाटेल.
अनुपम खेर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
मी त्यांच्याबद्दल काय बोलणार. त्यांनी आतापर्यंत 550 सिनेमे केले. अजूनही त्यांच्या कामाची भूक, त्यांचा अप्रोच पाहून बरंच काही शिकण्यासारखं आहे. मी त्यांना विचारलं की 'एवढ्या सिनेमांनंतर कधी कंटाळा आला का?' ते म्हणतात, 'आपल्याला सगळंच येतंय असं वाटणं धोकादायक आहे.' म्हणून मी प्रत्येक सिनेमा पहिला असल्यासारखंच त्याकडे बघतो. मी नशिबवान आहे की मला त्यांच्यासोबत काम करता आलंय.
सिनेमाची रिलीज डेट बऱ्याचदा पुढे ढकलली. याविषयी काय वाटतं?
दुर्दैव आहे. इतकी तयारी केल्यावर सिनेमा रिलीज झाला नाही की वाईट वाटतं. निर्मात्यांचंही नुकसान होतं. पण प्रत्येक सिनेमाचं नशीब असतं व्हायचा तेव्हा तो रिलीज होतोच. कितीही प्रयत्न केला तरी त्याचं भवितव्य बदलता येत नाही. आम्हीही टीममध्ये तेच बोललो की वाईटाचा विचार करण्यापेक्षा चांगल्यासाठीच झालंय असं समजुया. याकडे सकारात्मकतेने बघुया.
ट्रेलरला आतापर्यंत कसा प्रतिसाद मिळाला? प्रेक्षकांना काय आवाहन कराल
मला वाटतं असे विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मनोरंजनापेक्षा चांगलं साधन नाही. सिनेमा कुठेच कंटाळवाणा होत नाही कारण याची पकडच घट्ट आहे.ट्रेलर तर सगळ्यांना आवडला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही नुकताच पाहिला. त्यांनीही खूप कौतुक केलं. कुठेतरी तुम्ही सिनेमाशी जोडला जाता म्हणूनच अगदी त्यांच्या सभेमध्येही ते सिनेमाबद्दल बोलले याचा आनंद आहे.