'क्रू'च्या सेटवर मराठी अभिनेत्रीसोबत अन्याय, मिळाली दुय्यम वागणूक; म्हणाली, 'दिवसभर मी...'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 12:59 PM2024-04-11T12:59:24+5:302024-04-11T13:00:53+5:30
अनेकदा तर असं व्हायचं की मी बाजूला उभी राहून...
एकता कपूरच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'क्रू' (Crew) सिनेमात करीना कपूर खान (Kareena Kapoor), तब्बू (Tabu) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) झळकल्या. तिघींनी सिनेमात एअर हॉस्टेसची भूमिका साकारली. याच सिनेमात तृप्ती खामकर (Trupti Khamkar) ही मराठमोळी अभिनेत्री झळकली. एअरपोर्टवरील कस्टम अधिकारीची तिने भूमिका साकारली. नुकतंच तृप्तीने एका मुलाखतीत सेटवर मिळालेल्या दुय्यम वागणुकीचा खुलासा केला. १२ तासांचं काम मेकर्सने अर्ध्या तासात करायला सांगितलं असाही तिने आरोप केला.
तृप्ती खामकरने 'झूम' ला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासे केलेत. 'क्रू'च्या सेटवर तिच्यावर कशाप्रकारे अन्याय झाला याबद्दल तिने मेकर्सवर अनेक आरोप लावले आहेत. तृप्ती म्हणाली, "जेव्हा तुम्ही मोठ्या स्टारकास्टसोबत काम करता तेव्हा साहजिकच आहे की आधी त्यांचं काम असतं मग ते घरी जातात. यानंतर तुमचं काम सुरु होतं. अनेकदा तर असं व्हायचं की १२ तासांच्या शिफ्टमध्ये सगळे कॅमेरे त्यांच्यावरच असायचे. मी बाजूला उभी राहून माझे संवाद पाठ करायचे. जेव्हा करीना, तब्बू आणि क्रितीचं पॅकअप व्हायचं त्यानंतर शेवटी जो अर्धा तास असायचा त्यात मला सांगितलं जायचं की तृप्ती आज पूर्ण दिवस जे काम झालंय ते अर्ध्या तासात करुन दाखव. मी म्हणायचे ठीक आहे होऊन जाईल. मग मी अर्ध्या तासात सगळे डायलॉग म्हणायचे."
जे काम १२ तासांचं आहे ते तृप्तीकडून अर्ध्या तासात करुन घेतल्याचा तिला राग आला होता. तसंच तिला स्क्रीप्टही दिली गेली नव्हती. सेटवर तिला पूर्ण दिवस लक्ष ठेवायला लागायचं की कोणते सीन्स शूट केले जात आहेत. जेणेकरुन ती तिच्या सीन्सची तयारी करेल. ती मुख्य अभिनेत्रींजवळ उभी राहून तिचे संवाद तर पाठ करायची रपण त्यांच्यासोबत परफॉर्म करण्याची संधी तिला मिळाली नाही.
ती पुढे म्हणाली, "क्रू मध्ये काम केल्यानंतर आता मी कोणत्याही परिस्थितीचा सामना करु शकते अशी मला जाणीव झाली. या सिनेमातून शिकण्याची प्रक्रिया चांगली होती. माझ्याकडे थिएटरमध्ये मास्टर डिग्री आहे पण याचा काही फायदा नाही. सेटवर तुम्हाला जे ट्रेनिंग मिळतं ते वेगळंच असतं. दिवसभर मी सीन कोणता सुरु आहे याकडे लक्ष ठेवायचे. मग मला वाटलं की मी सेटवर कोणत्याही आव्हानांचा सामना करु शकते."