‘मास्टर’पुढे प्रेक्षकांना पडला कोरोनाचा विसर, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 02:35 PM2021-01-21T14:35:37+5:302021-01-21T14:38:03+5:30
आठवडाभरात कमावले इतके कोटी
साऊथ सुपरस्टार थलपती विजय आणि विजय सेतुपती यांचा ‘मास्टर’ हा सिनेमा गेल्या 13 जानेवारीला रिलीज झाला आणि आठवडाभरात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. होय, सिनेमा लोकांना इतका आवडला की, कोरोना काळातही चित्रपटगृहांबाहेर रांगा लागल्या. परिणामी पहिल्या आठवड्यात सिनेमाने बक्कळ कमाई केली.
‘मास्टर’ हा कोरोना काळात प्रदर्शित झालेला पहिला सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आहे. रिलीजच्या पहिल्याच आठवड्यामध्ये या सिनेमाने सुमारे 180 कोटी रुपयांची कमाई केली.
आंध्र बॉक्स ऑफिस डॉट कॉमने दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘मास्टर’ने प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात जगभरातून 188.1 कोटी रुपयांचा बिझनेस केला. केवळ एकट्या तामिळनाडूत या सिनेमाने पहिल्या आठवड्यात 100 कोटींचा गल्ला जमवला आणि एका विक्रमावर नाव कोरले. आत्तापर्यंत रजनीकांत वगळता कोणत्याही साऊथ स्टारच्या सिनेमाने हा पल्ला गाठला नव्हता. मात्र विजयच्या सिनेमाने मात्र ही जादू केली. भारतात चित्रपटाने सुमारे 114 कोटी रुपयांची कमाई केल्याचे म्हटले जात आहे.
‘मास्टर’ हा मुळात एक तामिळ सिनेमा आहे. मात्र तेलगूसोबत हिंदी भाषेतही तो रिलीज करण्यात आलाय. सोशल मीडियावर या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. विजयच्या दमदार अभिनयाचे आणि अॅक्शनचे तोंडभर कौतुक होतेय. चित्रपटाची कथा एका कॉलेज प्रोफेसरच्या आयुष्यावर बेतलेली आहे. विजयने ही भूमिका साकारली. हा प्राफेसर साधासुधा नाही. कारण संपूर्ण ट्रेलरमध्ये तो केवळ फाईटींग करतानाच दिसतोय. हा विद्यार्थ्यांचा गुरू नाही तर त्यांचा रक्षक आहे.
‘मास्टर’ चित्रपटाची लोकप्रियता पाहता कबीर सिंग चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी या चित्रपटाचे हक्क खरेदी केल्याचे कळतेय.