Loksabha Election 2024: 'रामा'ने विजयाचा गुलाल उधळला, अरुण गोविल यांची मेरठमधून संसदेत ग्रँड एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 07:01 PM2024-06-04T19:01:44+5:302024-06-04T19:03:21+5:30
Lok Sabha Elections Result 2024: लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल हळहळू स्पष्ट होत आहे. मतमोजणी जशी जशी अंतिम टप्प्यात ...
Lok Sabha Elections Result 2024: लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल हळहळू स्पष्ट होत आहे. मतमोजणी जशी जशी अंतिम टप्प्यात जात आहे, चित्र समोर दिसत आहे. देशातील काही मतदारसंघ हे फार चर्चेत राहिले. त्यापैकीच एक होता उत्तर प्रदेशातीलमेरठ मतदारसंघ. भाजपच्या तिकीटावर मेरठ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या अरुण गोविल (Arun Govil) यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे.
अरुण गोविल यांनी विरोधात असलेल्या सपा- काँग्रेसच्या उमेदवार सुनिता वर्मा यांचा तब्बल 9 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केलाय. लोकसभा निवडणुकीत भरघोस मतं मिळाल्यानंतर चाहत्यांकडून अरुण गोविल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अरुण गोविल आणि सुनिता वर्मा यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळाली. कधी अरुण गोविल आघाडीवर होते तर कधी सुनीता वर्मा आघाडीवर होत्या. पण, अरुण गोविल यांनी मुसंडी मारली आणि अखेर विजय खेचून आणला.
अरुण गोविल मेरठमध्ये भाजपचा गड राखला आहे. गेल्या चारही निवडणुकीत या ठिकाणी भाजपचाच उमेदवार विजयी होत आला आहे. यंदाही आता चौथ्यांदा अरुण गोविल यांच्या रूपाने भाजपने येथे विजय मिळवला आहे. राजेंद्र अग्रवाल 2009, 2014, 2019 मध्ये मेरठ लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार होते. आता पुन्हा या मतदारसंघात भाजपने गुलाल उधळला आहे.
मेरठमध्ये 26 एप्रिल 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलं होतं. अरुण गोविल यांनी 2021 मध्ये भाजपात प्रवेश केला होता.अरुण गोविल हे भाजपाचा लोकप्रिय चेहरा आहे, आजही मोठ्या संख्येने लोक त्यांना प्रभू रामाची भूमिका केल्यामुळे ओळखतात. अरुण गोविल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून स्वत:चा दमदार प्रचार केला आहे. अनेक मंदिरांना भेटी देणं, मेरठमधील लोकांशी बोलणं अशा अनेक गोष्टी त्यांनी सातत्यानं केल्या आहेत.