Mehmood birthday special : या कारणामुळे दुखावले गेले होते मेहमूद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 09:50 AM2018-09-29T09:50:15+5:302018-09-29T15:56:49+5:30
मेहमूद यांचे कॉमिक टायमिंग, संवाद म्हणण्याची पद्धत हे सगळे प्रेक्षकांना भावत होते. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. मेहमूद यांनी बॉलिवूडमध्ये त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले असले तरी त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता.
मेहमूद यांचा 29 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांचा जन्म 29 सप्टेंबर १९३२ रोजी झाला. मेहमूद यांचे वडील मुमताज अली बॉम्बे टॉकिजमध्ये काम करायचे. घराच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मेहमूद मालाड ते विरार दरम्यान चालणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये चॉकलेट विकायचे. लहानपणापासूनच मेहमूद यांना अभिनयात रस होता. वडिलांच्या ओळखीमुळे मेहमूद यांना १९४३ मध्ये बॉम्बे टॉकिजच्या किस्मत या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात मेहमूद यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती.
मेहमूद यांचे कॉमिक टायमिंग, संवाद म्हणण्याची पद्धत हे सगळे प्रेक्षकांना भावत होते. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. मेहमूद यांनी बॉलिवूडमध्ये त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले असले तरी त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी पैसे कमवण्यासाठी अनेक छोटी- मोठी कामं केली. ते दिग्दर्शक पीएल संतोषी यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम केले होते. त्यासाठी त्यांनी ७५ रुपये मानधन मिळत असे. एवढेच नव्हे तर मीनाकुमारी यांना टेनिसचे धडे देण्याचे काम देखील त्यांनी केले आहे. त्या काळात मीना कुमारी आणि मेहमूद यांची चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे त्यांनी बी आर चोप्रा यांना मेहमूद यांना एका चित्रपटात घेण्याविषयी सांगितले होते. पण मीना कुमारी यांनी मेहमूद यांचे नाव सुचवल्याचे त्यांना आवडले नाही. त्यामुळे त्या चित्रपटातून ते बाहेर पडले. यानंतर त्यांची मैत्री गुरुदत्त यांच्यासोबत झाली. त्यांनी प्यासा या चित्रपटात त्यांना एक छोटीशी भूमिका दिली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
मेहमूद यांनी बॉलिवूडमधील एक काळ गाजवला असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. एक काळ असा होता की, मेहमूद चित्रपटातील नायकांपेक्षा जास्त पैसा घेत असत. मेहमूद चित्रपटात असले की, चित्रपट हा हिटच होणार असे त्यावेळेचे समीकरण होते. त्यामुळे चित्रपटात मेहमूद यांचा एक खास सीन ठेवला जात असे. मेहमूद चित्रपटात आहेत हे कळल्यावर त्या गोष्टीची त्या काळातील प्रसिद्ध हिरो देखील धास्ती घ्यायचे आणि चित्रपटातून स्वतःचे नाव लगेचच मागे घ्यायचे.
मेहमूद आणि अमिताभ बच्चन यांचे तर संबंध खूपच चांगले होते. अमिताभ बच्चन यांना ते आपला मुलगा मानत आणि त्यामुळेच बॉम्बे टू गोवा या चित्रपटात अमिताभ यांना त्यांनी काम करण्याची संधी दिली. पण मेहमूद यांच्या उतारवयात अमिताभ आणि त्यांच्या नात्यात कटूता आली होती. मेहमूद यांच्या आयुष्यातील एक प्रसंग ते कधीच विसरू शकत नाहीत. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे ब्रीच कँडी रुग्णालयात होते. त्याचवेळी मेहमूद यांची बायपास सर्जरी झाल्याने त्यांना देखील त्याच रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. पण अमिताभ त्यांना भेटायला गेले नव्हते. या गोष्टीचे मेहमूद यांना खूप वाईट वाटले होते.