#MeToo : विनता नंदाविरोधात आलोकनाथ यांनी केला मानहानीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 01:07 PM2018-10-13T13:07:06+5:302018-10-13T13:14:57+5:30
दिग्दर्शक-निर्मात्या विनता नंदा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.
बॉलिवूडमध्ये मीटू मोहिम सुरू झाल्यापासून एकानंतर एक व्यक्तींची नावे समोर येत आहेत. या यादीत बॉलिवूडच्या संस्कारी बाबू म्हणजेच अभिनेता आलोकनाथ यांच्या नावाचाही समावेश आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्या विनता नंदा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. विनता नंदा यांच्या आरोपानंतर आलोक नाथ यांनी कायदाचा आधार घेत विनता नंदा यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
विनता नंदा यांनी वीस वर्षांपूर्वी बॉलिवूड व टीव्हीच्या दुनियेतील सर्वात संस्कारी अभिनेत्याने माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केला. विनता नंदा यांच्या पोस्टनंतर काही अभिनेत्री आणि महिलांनीही आलोक नाथ यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केले. या प्रकरणामुळे मानहानी झाल्याचे म्हणत आलोकनाथ यांनी विनता नंदाविरोधात न्यायालयामध्ये मानहानीचा दावा केला आहे. दरम्यान, आलोक नाथ यांनी तक्रार दाखल करत त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचीही मागणीही केल्याचे सांगण्यात येत आहे. विनता नंदा यांच्या आरोपानंतर ‘हम साथ साथ है’ चित्रपटाची क्रू मेंबर, अभिनेत्री संध्या मृदुल, नवनीत निशान यांनीसुद्धा आलोक नाथ यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.
तनुश्री दत्ताने अनेक महिलांना लैंगिक छळ, शोषण व गैरवर्तनाबद्दल बोलण्याचे बळ दिले. तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर बॉलिवूडमध्ये ‘मीटू’ मोहिमेचे वादळ उठले आहे. या वावटळीत अनेक बड्या बड्या व्यक्तिंचे मुखवटे गळून पडले आहेत.