#MeToo : मीटू इफेक्ट! दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 06:50 PM2018-10-16T18:50:01+5:302018-10-16T18:50:44+5:30
बॉलिवूडमध्ये मीटू मोहिमेचे मोठे पडसाद उमटू लागले आहेत. लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर अनेकांना आपले प्रोजेक्ट हातचे गमवावे लागले आहेत.
बॉलिवूडमध्ये मीटू मोहिमेचे मोठे पडसाद उमटू लागले आहेत. लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर अनेकांना आपले प्रोजेक्ट हातचे गमवावे लागले आहेत. विकास बहल, नाना पाटेकर, साजिद खान अशा दिग्गजांनी आपले प्रोजेक्ट हात गमावले. आता इंडस्ट्रीत मोठ्या पदांवर बसलेल्या लोकांसोबतच्या बॉलिवूड स्टार्सच्या डील्सही रद्द होऊ लागल्या आहेत. फिल्म इंडस्ट्रीत असेच एक बडे नाव म्हणजे अनिर्बन दास बलाह याचे. अनिर्बन हा बॉलिवूडचा टॉपचा टॅलेंट मॅनेजर म्हणून ओळखला जातो. पण चार तरूणींनी त्याच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केलेत. यापैकी एका अभिनेत्रीने अनिर्बनवर गंभीर आरोप केलेत. ‘कास्टिंग बेडरूममध्ये होते, सार्वजनिक स्थळी नाही,’ असे अनिर्बन आपल्याला म्हणाल्याचे तिने म्हटले आहे.
या आरोपानंतर ‘Kwan’ एंटरटेनमेंटने अनिर्बनला आपल्या कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. (अनिर्बन हा लीडिंग टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी Kwan एंटरटेनमेंटचा फाऊंडर होता.) याशिवाय अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनेही अनिर्बनला आपल्या फाऊंडेशनमधून बडतर्फ केल्याचे कळतेय. अनिर्बन हा दीपिकाच्या ‘द लिव्ह लव्ह लाफ’ या मेंटल हेल्थ फाऊंडेशनचा बोर्ड मेंबर होता. या फाऊंडेशनमध्ये तो सल्लागार सदस्य म्हणून काम करत होता. सूत्रांचे मानाल तर फाऊंडेशनने आपल्या बोर्डातून अनिर्बनचे नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. दीपिकाने डिप्रेशनमधून बाहेर आल्यानंतर या फाऊंडेशनची स्थापना केली होती.
दरम्ययान मीटू वादात सापडल्यानंतर अनिर्बन अटकेच्या भीतीने देश सोडून पळून गेल्याच्याही बातम्या येत आहेत. सोशल मीडियावर तशी जोरदार चर्चा आहे.