#MeToo : ‘मीटू’ इफेक्ट! अनु मलिक यांचे ‘इंडियन आयडल 10’चे परिक्षकपद धोक्यात!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 11:06 AM2018-10-21T11:06:05+5:302018-10-21T11:06:42+5:30
‘मीटू’ मोहिमेने बॉलिवूड ढवळून निघाले असताना आता याच मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरतर्वनाचे आरोप झेलणारे संगीतकार अनु मलिक यांच्याबद्दल एक ताजी बातमी आहे.
‘मीटू’ मोहिमेने बॉलिवूड ढवळून निघाले असताना आता याच मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरतर्वनाचे आरोप झेलणारे संगीतकार अनु मलिक यांच्याबद्दल एक ताजी बातमी आहे. होय, अनु मलिक यांच्यावर आत्तापर्यंत चार महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. सर्वप्रथम गायिका श्वेता पंडित हिने अनु मलिक यांच्यावर गंभीर आरोप केलेत. यानंतर गायिका सोना मोहपात्रा हिनेही अनु मलिक यांच्यावर गैरवर्तनाचा ठपका ठेवला. पाठोपाठ अन्य दोन महिलांनीही अनु मलिकविरोधात आवाज उठवला. मात्र, दोघींनीही नावे जाहीर केलेली नाहीत.
‘अनू मलिक यांच्या घरी गेले असता, सोफ्यावर ते माझ्या बाजूला येऊन बसले आणि त्यांनी माझा स्कर्ट वर करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना ढकलून पळण्याचा प्रयत्न केला, पण मला ते शक्य झाले नाही. नशिबाने तेव्हा कोणीतरी दार वाजवले, पण या प्रसंगाबाबत कोणाला काही न सांगण्याची धमकी त्यांनी मला दिली, असा एका महिलेचा आरोप आहे.अनु मलिक यांच्यावर दुसरा आरोप करणारी महिला इंडियन आयडलच्या काही वर्षांपूर्वीच्या भागाची स्पर्धक राहिली आहे.
ताज्या बातमी खरी मानाल तर या आरोपांमुळे अनु मलिक यांचे ‘इंडियन आयडल’चे परिक्षकपद धोक्यात आले आहे. सध्या अनु मलिक ‘इंडियन आयडल’चे दहावे सीझन जज करत आहेत. पण लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपानंतर त्यांना या पदावरून हटवावे, यासाठीचा दबाव वाढला आहे. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, या दबावानंतर सोनी टीव्हीने अनु मलिक यांना ‘इंडियन आयडल 10’च्या परिक्षकपदावरून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत अनु या शोमध्ये दिसणार नाहीत. त्यामुळे पुढील काही एपिसोडमध्ये अनु मलिक नसणार, असे या शोशी संबंधित सूत्रांनी म्हटले आहे.