#MeToo: पायल रोहतगीचा सवाल; दिबाकर बॅनर्जीविरूद्ध कारवाई करणार का यशराज फिल्म्स?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 15:59 IST2018-10-22T15:58:33+5:302018-10-22T15:59:05+5:30
नामवंत दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांच्यावरही लैंगिक गैरवर्तनाचा आरोप लागला आहे. होय, अभिनेत्री पायल रोहतगी हिने दिबाकर यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे.

#MeToo: पायल रोहतगीचा सवाल; दिबाकर बॅनर्जीविरूद्ध कारवाई करणार का यशराज फिल्म्स?
‘मीटू’ मोहिमेअंतर्गत बॉलिवूडमध्ये रोज नव्या बातम्या समोर येत आहेत. लैंगिक शोषणाचा आरोप झेलणाऱ्या अनेकांविरूद्ध प्रॉडक्शन हाऊस आणि कंपन्या कठोर पाऊले उचलत आहेत. याच संपूर्ण घडामोडीदरम्यान नामवंत दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांच्यावरही लैंगिक गैरवर्तनाचा आरोप लागला आहे. होय, अभिनेत्री पायल रोहतगी हिने दिबाकर यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. २०११ मध्ये ‘शंघाई’ चित्रपटाच्या आॅडिशनदरम्यान दिबाकर बॅनर्जी यांनी आपल्याशी गैरवर्तन केले, शर्ट उतरवण्यास व पोट दाखवण्यास सांगितले, असा आरोप पायलने केला आहे.
मिड डेला दिलेल्या मुलाखतीत पायलने ही आपबीती सांगितली़ ‘त्या आॅडिशनदरम्यान दिबाकर बॅनर्जी यांनी मला शर्ट उतरवून पोट दाखवण्यास सांगितले. त्यावेळी मी प्रचंड घाबरले होते. त्यामुळे मी याविरोधात तक्रार दाखल केली नाही. पण आता ‘मीटू’ मोहिमेने मला धीर दिला आहे. याक्षणाला यशराज फिल्म्स माझ्या बाजूने उभी होईल की नाही, मला ठाऊक नाही. पण यशराज फिल्म्स दिबाकर बॅनर्जीबद्दल सगळे काही जाणून आहे,’ असे पायलने म्हटले आहे.
तूर्तास दिबाकर बॅनर्जी सध्या यशराज बॅनरच्या ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अलीकडे यशराज फिल्म्सचा बिझनेस हेड आशिष पाटीलवर मीटू मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तनाचा आरोप झाला होता. या आरोपानंतर यशराजने आशिष पाटील याला तात्काळ बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता दिबाकर बॅनर्जीही या आरोपात अडकले आहेत. त्यामुळे आशिष पाटीलप्रमाणेच दिबाकर बॅनर्जी यांच्यावर यशराज काय कारवाई करते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.