#MeToo: साजिद खानला महिलांचा आदर करणं कधी जमलेच नाही - बिपाशा बासू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 13:45 IST2018-10-13T13:41:01+5:302018-10-13T13:45:13+5:30
मीटू मोहिमेने बॉलिवूडमध्ये जोर धरला असून या मोहिमे अंतर्गत तीन तरूणींनी निर्माता-दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

#MeToo: साजिद खानला महिलांचा आदर करणं कधी जमलेच नाही - बिपाशा बासू
मीटू मोहिमेने बॉलिवूडमध्ये जोर धरला असून या मोहिमे अंतर्गत तीन तरूणींनी निर्माता-दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यात अभिनेत्री सलोनी चोप्रा, रैचल वाइट व एका पत्रकार महिलेचाही समावेश आहे. यानंतर अक्षय कुमारने हाऊसफुल 4चे शूटिंग थांबवण्यात यावे अशी विनंती निर्मात्यांकडे ट्विटरवरून केली होती. कारण या सिनेमाचा दिग्दर्शन साजिद खान करतो आहे. लैंगिक अत्याचाराचे आरोप असणाऱ्यांसोबत मी काम करणार नाही अशी भूमिका अक्षयने घेतली आहे. यानंतर साजिदने या सिनेमाचे दिग्दर्शन न करण्याचा निर्णय घेतला. या सिनेमाचे चित्रीकरण जैसलमेरमध्ये सुरू होते. यानंतर या आरोपांनंतर साजिदची बहिण फराह खाननेही त्या महिलांना पाठिंबा दिला आहे. आता साजिद विरोधात बिपाशा बासूही पुढे आली आहे.
बिपाशा बासू म्हणाली, की साजिद खान नेहमी असाच होता. तो महिलांसमोरही अश्लील विनोद करायचा. महिलांचा आदर करणे त्याला कधी जमलेच नाही. त्याच्या याच वागण्यामुळे हमशकलनंतर त्याच्यासोबत कोणताही चित्रपट न करण्याचा निर्णय मी घेतला. मात्र, आपल्याला त्याच्याकडून अशाप्रकारचा थेट त्रास कधीही झाला नसल्याचेही तिने स्पष्ट केले.
अभिनेत्री सलोनी चोप्राने साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला. तिने २०११ साली साजिद खानकडे मुलाखत देण्यासाठी गेली असतानाचा अनुभव यावेळी उघड केला. साजिद खानने यावेळी तुझ्यावर कधी लैंगिक अत्याचार झालेत का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्याचे तिने सांगितले. यासोबतच साजिद आपल्याला लैंगिक संबंधांबद्दल सांगू लागला असेही तिने म्हटले. साजिद मला वारंवार कॉल करत असे, तो कामाचे कधीही बोलत नसे. मी कोणते कपडे घातले आहेत असे प्रश्न तो मला विचारायचा. अनेकदा त्याने मला बिकिनीमधील फोटो पाठवण्यासाठी सांगितले होते, असेही सलोनीने सांगितले. इतर २ महिलांनीही साजिदवर अशाच प्रकारचे आरोप केले होते.